औरंगाबाद - शेंद्रा औद्योगिक वसाहतीत काम संपल्यानंतर मोपेड वाहनाने रात्री दहाच्या सुमारास घरी परतत असताना समीर हनीफ शेख (वय २७, रा. शाहनगर, मसनतपूर, चिकलठाणा) या तरुणाच्या मोपेडला अज्ञात वाहनाने मागून जोराची धडक दिल्याने समीर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. दरम्यान, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारासाठी रुग्णालयात पोहोचण्यासाठी उशीर झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सहा महिन्यापूर्वीच झाला होता विवाह
समीर शेख याचा सहा महिन्यापूर्वी विवाह झाला होता. तो रंगकाम करण्याचे काम घेत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याला कामेही मिळत होती. यामुळे परिवारातदेखील आनंदाचे वातावरण होते. यामुळे त्याच्या संसाराचा गाडा सुरळीत सुरू होता. मात्र काळाने घाला घातला आणि त्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. समीरची पत्नी गर्भवती असल्याची माहिती परिवारातील सदस्यांनी दिली.
पोलिसांच्या निष्काळजीपणाचा परिवाराचा आरोप
समीरचा आपघात रात्री दहाच्या सुमारास घडला असताना काही वेळात पोलीस घटनस्थळी पोहोचले. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी समीरचा मृतदेह तब्बल दीड तास घटनास्थळी पडून होता. समीरला वेळीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असते, तर त्याचा मृत्यू झाला नसता. त्यामुळे पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप परिवाराने केला.