औरंगाबाद-शहरात मंगळवारी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे शहर जलमय झाले होते. त्या दिवशी अवघ्या एका तासात ११६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून या पावसाच्या पाण्यामुळे मुकुंदवाडी भागातील रस्त्यांना नाल्याचे स्वरुप आले होत. त्याच दरम्यान या रस्त्यावरुन जाणाऱ्या दोन तरुणी या पाण्यात वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामध्ये एका मुलीचा बुडून दुर्दैवी अंत झाला. तर दुसरी सुदैवाने बचावली. या घटनेमुळे मुकुंदवाडी भागात संतापाची लाट पसरली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडल्यानंतर महालिका आणि पोलीस प्रशासनाकडून बुधवारी दुपारपर्यंत साधा पंचनामा देखील करण्यात आला नव्हता. त्यामुळे मुलीच्या पालकांसह शहारातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. तसेच पालिका प्रशासनाच्या विरोधात जमावाने आंदोलनाला सुरुवात केली आहे. मुकुंदवाडीतील रेल्वे गेट क्र. ५६ जवळ मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. रुपाली दादाराव गायकवाड (२१) आणि आम्रपाली रघुनाथ म्हस्के (१८, दोघीही रा. राजनगर, मुकुंदवाडी) अशी पाण्यात वाहून गेलेल्या मुलींची नावे आहेत. या दोन्ही मुली शेंद्रा एमआयडीसीतील धुत ट्रान्समिशन कंपनीत कामाला आहेत. यामध्ये रुपालीचा मृत्यू झाला.
मंगळवारी रात्री आठच्या सुमारास काम संपल्यावर दोघीही घराकडे निघाल्या होत्या. त्याचदरम्यान शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच सगळीकडे पाणीच पाणी झाले. रस्त्याला नदी, नाल्याचे स्वरुप आले होते. रात्री साडेआठच्या सुमारास रुपाली आणि आम्रपाली मुकुंदनगरहून रेल्वे पटरी ओलांडून राजनगरकडे जात होत्या. रेल्वे गेट क्र. ५६ जवळून जात असताना रुपाली पुढे तर आम्रपाली तिच्या मागे होती. नेहमीचा रस्ता असल्यामुळे रुपालीने रस्ता समजून पाण्यात पाय ठेवला. मात्र, अतिवृष्टीमुळे रस्ता आधीच वाहून गेला होता. त्यामुळे तेथे भला मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यात रुपालीचा पाय पडला. तेवढ्यात तिच्या मागे असलेली आम्रपाली देखील त्याच खड्ड्यात पडली.