महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

औरंगाबादमध्ये मोबाईल चोराची लाठी लागल्याने रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू - मोबाईल

आतेभावासोबत परतूरकडे जाण्यासाठी तपोवन एक्सप्रेसच्या जनरल डब्यात चढला होता. रेल्वेत प्रचंड गर्दी असल्याने स्वप्नील डब्याच्या दारातच बसला होता. मिलिंदनगर रेल्वेगेटजवळ उभ्या असलेल्या चोराने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावण्यासाठी बांबूने हिसका मारला.

स्वप्निल राठोड

By

Published : Apr 27, 2019, 10:40 AM IST

औरंगाबाद - धावत्या रेल्वेतील प्रवाशाला लाठी मारुन मोबाईल चोरताना प्रवासी युवक खाली पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील मालकोंडी येथे राहणाऱ्या स्वप्नील शिवाजी राठोड (वय १९) युवकाचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

स्वप्नील हा कला शाखेच्या द्वितीय वर्षात शिकत होता. शहरात स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी तो राहतो. येत्या २८ एप्रिल रोजी त्याच्या मामाचे लग्न होते. त्यासाठी स्वप्नील शुक्रवारी दुपारी आतेभावासोबत परतूरकडे जाण्यासाठी तपोवन एक्सप्रेसच्या जनरल डब्यात चढला होता. रेल्वेत प्रचंड गर्दी असल्याने स्वप्नील डब्याच्या दारातच बसला. मिलिंदनगर रेल्वेगेट येताच त्याला मित्राचा फोन आला. तेव्हा मोबाईल उचलून मित्राशी बोलण्याचा प्रयत्न करत असतानाच मिलिंदनगर रेल्वेगेटजवळ उभ्या असलेल्या चोराने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावण्यासाठी बांबूने हिसका मारला. त्यावेळी तोल गेल्याने स्वप्नील राठोड धावत्या रेल्वेतून खाली पडला. यामध्ये स्वप्नीलच्या डोक्याला गंभीर मार लागला.

भारतीय रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी स्वप्नीलला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दरम्यान, स्वप्नीलच्या अकस्मात मृत्यूची नोंद उस्मानपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार कल्याण शेळके करत आहेत. याआधीही अशाप्रकारच्या अनेक घटना परिसरात घडल्या आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. या भागात अनेक गुन्हेगारांचे वास्तव्य आहे. स्वप्नीलच्या मृत्यूला चोरटा जबाबदार असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details