औरंगाबाद- कुरीअरच्या माध्यमातून परराज्यातून ऑनलाइन मागविण्यात आलेले 41 तलवारी, सहा कुकरी व दोन गुप्ती, असा एकूण 49 शस्रे असलेला साठा पुंडलिकनगर, जिन्सी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी बायजीपुरा येथील एका 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे असून या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. दीपक गिऱ्हे यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, इरफान उर्फ दानिश खान अयुब खान (वय 21 वर्षे, रा. हमजा मशीदजवळ, जुना बायजीपुरा), असे अटकेत असलेल्या तरुणाचे नाव आहे. इरफान उर्फ दानिश याने काही दिवसांपूर्वी घरच्यांच्या मनाविरुद्ध प्रेम विवाह केला होता. यामुळे घरच्यांनी त्याला घरातून बाहेर काढले होते. त्यामुळे तो पत्नीसह बायजीपुरा येथे भाड्याच्या घरात राहू लागला. त्यावेळी त्याला पैशाची गरज भासू लागली म्हणून तो लग्न, वाढदिवस, अशा इतर कार्यक्रमावेळी तलवार भाड्याने देण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसाने तो तलवारी विकू लागला. यामध्ये जास्त पैसे मिळत असल्याने तो परराज्यातून ऑनलाइन पद्धतीने मोठा शस्त्र साठा मागवला होता. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर ज्या वाहनातून कुरीअरने शस्त्रसाठा येणार होता. त्या वाहनाची पोलिसांनी झडती घेतली. त्यात शस्त्रसाठा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत दानिशला अटक केली. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.