औरंगाबाद -काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्याची कोरोनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे शहरातील काही धार्मिक स्थळांमध्ये भक्तांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी २० टक्के भक्त धार्मिक स्थळी बघायला मिळाले. तर काही ठिकाणी नियमांचं पालन केलं जात नसल्याचं चित्र आहे. धार्मिक स्थळांमध्ये येणाऱ्या भक्तांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
रुग्णसंख्या वाढल्याने धार्मिक स्थळांमध्ये भक्तांची संख्या घटली दिवसाला २००-३०० भक्त
गेल्या आठवडाभरापासून शहरातील कोरोनाबाधित रुग्ण संख्येने दिवसाला दोनशेचा आकडा गाठला आहे. यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या ही ४८ हजार ७७० एवढी झाली आहे. शहरातील विविध धार्मिक स्थळांमध्ये भक्तांची संख्या कमी झाली आहे. ज्या धार्मिक स्थळांमध्ये दिवसाला हजार भक्त दर्शनासाठी येत होते त्याच मंदिरात आता 200 ते 300 भक्त दिवसाला येत आहेत, अशी माहिती मंदिरातील पंकज खोडेगावकर पुजारी यांनी दिली.
प्रशासनाचे आवाहन
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी नियम व अटींचे पालन न केल्यास लॉकडाऊन लावण्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. 23 फेब्रुवारी ते 14 मार्च या काळात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. नागरिकांनी नियम व अटींचे पालन करावे असे आवाहन वारंवार जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास शहरात लॉकडाऊन लावण्याची वेळ येणार नाही.