औरंगाबाद- वाळूज परिसरात वडगाव बजाजनगर येथे २७ वर्षीय सराईत गुन्हेगाराचा शुक्रवारी 21 मे रोजी दगडाने ठेचून खून केल्याची खळबळजनक घटना बजाजनगर येथे घडली होती. विशाल ऊर्फ मड्ड्या किशोर फाटे असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. फरार झालेल्या आरोपीला वाळूज एमआयडीसी पोलिसांनी बारा तासात जेरबंद केले आहे.
दगडाने ठेचून खून
वडगाव कोल्हाटी येथील विशाल उर्फ मड्ड्या फाटे याचा शुक्रवारी 21 मे रोजी रात्री दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाले. दरम्यान पोलिसांनी मृतदेह घाटीत दाखल केला. याप्रकरणी मृत विशालचा भाऊ अभिजीत याने दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी सचिन प्रधान, अजय प्रधान रा. वडगाव (को.) अतिश काळे, नामदेव प्रधान, दर्शन चौधरी व अन्य तीन अनोळखी विरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पाटोद्यात केली अटक
फरार आरोपींच्या शोधात वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पथके तयार केली. यात पोलीस नाईक प्रकाश गायकवाड यांना माहिती मिळाली की आरोपी हे पाटोदा येथील त्यांच्या नातेवाईकांकडे लपून बसलेले आहेत. त्यावरून पोलिसांनी पाटोदा येथे छापा टाकून सचिन सोमनाथ प्रधान (२९), अजय सोमनाथ प्रधान (२३) आणि अतिश लक्ष्मण काळे (३४) यांना ताब्यात घेऊन जेरबंद केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार, सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळे, पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडित, विक्रम वाघ, कयूम पठाण, प्रकाश गायकवाड, अविनाश ढगे, सुधीर सोनवणे, नवाब शेख, दीपक मतलब यांनी केली.
हेही वाचा- नागपुरात म्युकर मायकोसिसमुळे 46 रुग्णांचा मृत्यू, 343 रुग्णांवर उपचार सुरू