औरंगाबाद -मंगळवारपासून शहरात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. पुढील पंधरा दिवसांसाठी ही संचारबंदी लागू करण्यात आली असून, या काळात अत्यावश्यक सेवा, कंपनीतील कामगार यांच्यासह सार्वजनिक वाहतूक सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
कलम 144 अंतर्गत संचारबंदी..
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता पाहता संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. याकाळात कोणात्याही कामांमध्ये अडथळा येणार नाही, मात्र अनावश्यक फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वैद्यकीय सेवा, कंपनीत जाणारे किंवा येणारे कामगार, पेट्रोल पंप, कॉल सेंटर सुरू राहणार आहेत. घराबाहेर राहणाऱ्या व्यक्तीकडे बाहेर असण्याचे ठोस कारण असावे लागेल, अनावश्यक फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी काही ठिकाणी अचानक नाकाबंदी करणे, तपासणी पॉईंट सुरू करणे अशा कारवाई केल्या जाणार असून, नागरिकांनी बंधने पाळायला हवीत असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.
औरंगाबादमध्ये नाईट कर्फ्यू लागू; रात्री केवळ अत्यावश्यक सेवाच राहणार सुरू हॉटेल सुरू ठेवण्यावर निर्बंध..
अनलॉक नंतर हॉटेल व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र महामार्गांवरील धाबे, हॉटेल, बार यांच्यामध्ये गर्दी वाढत चालली आहे. रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये नागरिक गर्दी करून असतात. त्यावेळी कोरोनाबाबत कुठलेच नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे हॉटेलांसंदर्भात नियम कडक करण्यात येणार आहेत. यापुढे सर्वच हॉटेल रात्री साडेदहा वाजता बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. वेळेच्या नंतर सुरू राहणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्त निखिल गुप्ता आणि पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली.
विमानतळावर पीपीई किट घालून तपासणी..
देश विदेशातून नागरिक विमान प्रवास करत आहेत, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत खबरदारी घेण्यासाठी आणि शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरता विमानतळावर प्रवाशांची आरोग्य तपासणी पीपीई किट घालून करण्यात येणार आहे. त्यानंतर विदेशातून येणाऱ्या नागरिकांना पंधरा दिवस अलगिकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.