औरंगाबाद- राज्यात पीएम केअर फंडातून प्राप्त झालेले व्हेंटिलेटर खराब असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याबाबत न्यायालयाने स्वतःहून दखल घेत केंद्राला उत्तर मागितले असताना देण्यात आलेले व्हेंटिलेटर पीएम केअर फडांतील नाही, असे उत्तर केंद्राने औरंगाबाद खंडपीठात दिले. त्यामुळे हे व्हेंटिलेटर नेमके आले कोणत्या निधीतून हा प्रश्न निर्माण झाला आहे.
न्यायालयात केंद्राने दिली माहिती
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला पीएम केअर फंडातून व्हेंटिलेटर देण्यात आले. मात्र कोरोना काळात गरजेचे असलेले व्हेंटिलेटर वापरण्याजोगे नसल्याचे दिसून आले. त्यावर राजकारण देखील रंगले. अशा परिस्थितीत औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेत केंद्र सरकारला याबाबत उत्तर मागितले. त्यावर देण्यात आलेले व्हेंटिलेटर ज्योती कंपनीचे असून त्यांची चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतरच हे व्हेंटिलेटर देण्यात आले, अशी माहिती देण्यात आली.