औरंगाबाद - वारवांर सरकार पडणार असल्याचे भविष्य वर्तविणाऱ्या भाजप नेत्यांची ज्योतिष विद्या खरी नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नावब मलिक यांनी लगावला आहे. तसेच सीरम संस्थेला भेट देण्यासाठी पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आले, मात्र यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना सोबत का घेतलं नाही? त्यांना कोरोना होण्याची भीती वाटत होती का? असा प्रश्न देखील मलिक यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचार मेळाव्यासाठी नवाब मलिक औरंगाबाद दौऱ्यावर आले असता, त्यांनी भाजपवर टीका केली.
मोफत लस देण्याची घोषणा का केली नाही... - उद्धव ठाकरे घरा बाहेर निघत नाहीत, अशी टीका भाजपचे लोक करतात. मात्र, ते बाहेर येतात तुम्ही पाहत नाही. तसेच मोदी आठ महिन्यानंतर बाहेर निघाले, त्यांनी आज सीरमला भेट दिली, नशीब तिथे जाऊन शास्त्रज्ञ होऊन औषध तोंडातून देऊ असे म्हणाले नाहीत. तसेच आम्हाला वाटले बिहार निवडणुकीत केली तशी आज देशातील नागरिकांना सर्वांना मोफत लस देऊ अशी घोषणा ते करतील की काय? मात्र तसे झाले नाही. अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच आज ते दौऱ्यावर असताना कोणत्याच मुख्यमंत्र्यांना न येण्याचा फतवा त्यांनी काढला. त्यांना कोरोना होण्याची भीती वाटत होती का? असा सवालही नवाब मलिक यांनी औरंगाबादेत उपस्थित केला.
भाजपचे दावे फेल...
महाविकास आघाडी सरकार दोन महिन्यांमध्ये पडेल आणि आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, अशी वक्तव्ये भाजपचे नेते करत आहे. मात्र ही भविष्यवाणी चुकीची आहे, ते ज्या ठिकाणी ज्योतिषशास्त्र शिकले तिथली शिकवण बरोबर मिळाली नाही. चंद्रकांत दादा चिठ्या काढू द्या, नाही तर चकवा दानवे यांनी काही वक्तव्य करू द्या, आम्ही पाच वर्षे नाही तर पुढची पंचवीस वर्षे सत्तेत राहणार, असा दावा करत नवाब मलिक यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
पक्षातून गेलेले अनेक जण लवकरच स्वगृही-
गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेस आज राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले अनेकजण स्वगृही परत येण्याबाबत विचारणा करत आहेत. लवकरच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार अधिकृत घोषणा करतील. वेगवेगळ्या प्रकारचे दबाव टाकून त्याना पक्षप्रवेश करायला लावला होता. ते सर्व स्वगृही परत येतील त्यांची यादी मोठी आहे. असे सूचक वक्तव्यही नवाब मलिक यांनी औरंगाबादेत केले.
काही कारणास्तव अनलॉक उशिरा केला-
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आपल्या राज्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव होता, देशात अनलॉक झाला तरी राज्यात अनलॉक करण्यात विलंब केला गेला. कारण त्यात उद्देश होता. नागरिकांचे आरोग्य लक्षात घेत हा निर्णय घेतला गेला. कधीही मंदिरात पाय न ठेवणाऱ्या लोकांनी मंदिर उघडण्याची मागणी केली. पण उद्धव ठाकरे साहेबांनी ते ऐकले नाही. आता मंदिर उघडली कितीवेळा मंदिरात गेलात? असा प्रश्न नवाब मलिक यांनी भाजप आणि मंदिर उघडण्याची मागणी करणाऱ्या संघटनांना केला आहे.