वैजापूर (औरंगाबाद) :नागपूर व पिंपरी-चिंचवड येथील पोलिस भरती घाेटाळ्यातील बनावट परीक्षार्थींच्या (Police recruitment racket) रॅकेटचे धागेदाेरे वैजापुरात मिळाले आहेत. नागपूर व पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Chinchwad Police) संजरपूरवाडी व तराट्याची वाडी येथून रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिस भरती परीक्षेत मूळ परीक्षार्थींकडून १३ लाखांच्या आर्थिक मोबदल्यात लेखी व मैदानी परीक्षा उत्तीर्ण करून देण्याची हमी या टोळीकडून दिली जात होती.
वैजापूर तालुक्यातील संजरपूरवाडी येथील जयलाल कारभारी कंकरवाल (२२) याला नागपूर व वैजापूर पोलिसांच्या पथकाने अटक केली. तर साथीदार अर्जुन चुडामण जारवाल फरार झाला होता. यानंतर पोलीसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे चरणसिंग मानसिंग काकरवाल व किशन सीताराम जोनवाल यांच्या शोधार्थ पोलिस पथक वैजापुरात दाखल झाले आहे.