औरंगाबाद- महानगरपालिकेने कैलासनगर स्मशानभूमीमध्ये गॅस दाहिनी उभारली आहे. मात्र या शवदाहिनीला प्रात्यक्षिक करण्यासाठी देह मिळत नसल्यामुळे या गॅस शवदाहिनीचे प्रात्यक्षिक थांबलेले होते. अखेर मातोश्री वृद्धाश्रमातील एका वृद्ध महिलेचे निधन झाल्यानंतर बुधवार दि.4 रोजी सकाळी महानगरपालिकेतर्फे अंत्यसंस्कार करून गॅस दहिनीची चाचणी करण्यात आली.
महानगर पालिकेने केले होते आवाहन
कोरोना संसर्गामुळे शहरात गेल्या वर्षभरापासून मृत्यूदर वाढला आहे. संसर्गामुळे शहरातील अनेक नागरिकांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्याचबरोबर शहरात जिल्ह्यासह मराठवाड्यातून अनेक जण उपचारासाठी आले. यातील अनेकांना जीव गमवावे लागले. त्यांच्यावर देखील शहरातच अंत्यसंस्कार करण्यात आले. म्हणून शहरातील स्मशानभूमीमध्ये वेटींग असल्याचे चित्र होते. महापालिकेने औरंगाबाद फर्स्ट संघटनेच्या माध्यमातून कैलासनगर येथील स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी सुरू केली आहे. या गॅसदाहिनीचे ट्रायल घेण्यासाठी मृतदेहाची शोधाशोध करावी लागली. यासाठी घाटी रुग्णालयाला पत्र देण्यात आले असून, एखादा बेवारस मृतदेह आल्यास गॅस दाहिनीच्या ट्रायलसाठी मिळावा, अशी विनंती महापालिकेने केली होती.