औरंगाबाद - दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांना जनाब म्हणून संबोधल त्याचा निषेध करतो, असे मत शिवसेना खासदार विनायक राऊत ( MP Vinayak Raut ) यांनी व्यक्त केले. तर महाविकास आघाडीत फुट पाडण्यासाठीच भाजपाने एमआयएमला पुढे केल्याचा आरोप देखील विनायक राऊत यांनी केला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
पत्रकार परिषदेत बोलताना खासदार विनायक राऊत 'फडणवीस यांनी बाळासाहेबांचा अवमान केला' बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदयसम्राट पदवी सर्व सामान्यांनी दिली. त्याचा मान सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केला. हिंदुत्वाची व्यापक व्याख्या ज्यांच्यामुळे कळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी बाळासाहेब उभे राहिले, अशा नेत्याचा उल्लेख जनाब म्हणून करून फडणवीस यांनी पाप केले आहे. त्यामुळे फडणवीस यांचा धिक्कार करतो. त्यांचा देवेंद्र मिया म्हणून उल्लेख केला पाहिजे. देवेंद्र मिया यांना जनाब ही पदवी दोन वर्षांपूर्वी मिळाली आहे. त्यामुळे स्वतःचा उल्लेख त्यांनी करून घेतला आहे, असे सांगत डोक्यावर मुस्लिम टोपी घातलेले फडणवीस यांचे फोटो विनायक राऊत यांनी दाखवले.
शिवसंपर्क अभियान मोहिमेला सुरुवात
औरंगाबादेत शिवसंपर्क अभियानाला खासदार विनायक राऊत यांनी सुरुवात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षात मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना अनेक योजना राबवल्या. त्याची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, त्याचा फायदा व्हावा यासाठी हे अभियान राबवत आहेत. राज्यात 19 खासदार या मोहिमेत समाविष्ठ झालेत. राज्य शिवमय करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. विरोधी पक्षाला उत्तर देण्याचे काम अभियानात केले जाईल, असे विनायक राऊत यांनी सांगितले.
'एमआयएमची ऑफर भाजपाने द्यायला लावली'
राज्यपाल त्रास देत आहेत. न्यायालयाने देखील ते पाहिले आहे, एमआयएची पिल्लावळ महाविकास आघाडीत सोडण्याचा प्रयत्न भाजपाच करत आहे, अशी पिल्लवळ ज्याचे नाते औरंगजेबासोबत आहे. त्याच्यासोबत शिवसेनेचे जमणे शक्य नाही. भाजपाच्या सांगण्यावरून सेनेच्या नादी लागू नका, चिरडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे.
हेही वाचा -Goa CM BPJ Candidate : गोवा मुख्यमंत्री निवडीवर देवेंद्र फडणवीस यांची 'ईटीव्ही भारत'सोबत खास मुलाखत