औरंगाबाद - एमआयएम पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार इम्तियाज जलील यांची निवड करण्यात आली आहे. पक्षातर्फे एक पत्रक काढून ही माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिरकाव करत जलील यांनी विजयश्री खेचून आणली, त्याचेच बक्षीस पक्षाकडून त्यांना देण्यात आले आहे.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जलील यांनी औरंगाबाद मध्य या मतदारसंघातून विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी 2015 च्या औरंगाबाद महानगरपालिकेत पक्षाचे २४ नगरसेवक निवडून आणत विरोधी पक्षनेतेपद पक्षाला पटकावून दिले. त्यानंतर 2019 ची लोकसभा निवडणूक त्यांच्यामुळे राज्यात सर्वात लक्षवेधी ठरली.
जिल्ह्यात गेल्या २० वर्षापासून खासदारकी आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या शिवसेनेला त्यांनी लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का दिला. एमआयएमचे उमेदवार जलील यांनी बहुजन वंचित आघाडीतर्फे निवडणूक लढवत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिरकाव केला. इतकंच नाही तर औरंगाबाद मतदार संघात प्रत्येक बुथवर त्यांनी मते मिळवली. मागील ४ वर्षात जलील यांनी अभ्यासू आमदार म्हणून आपली एक वेगळी छाप पाडली. त्याचाच उपयोग त्यांना औरंगाबाद लोकसभेत झाला. मागच्या साडेचार वर्षात औरंगाबाद महानगरपालिकेत त्यांच्या पक्षातर्फे त्यांनी अनेक गोष्टींवर आवाज उठवला. दारुबंदी असेल कचऱ्याचा प्रश्न असेल हे प्रश्न मोठ्या प्रमाणात त्यांनी मार्गी लावण्याचा आग्रह धरला.
लोकसभा निवडणुकीत त्यांच्या विजयामुळे महाराष्ट्रात एमआयएमने आपले खाते उघडले. त्यामुळेच आता पक्षाने त्यांच्याकडे पूर्ण राज्याची जबाबदारी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वात राज्यात भरघोस यश मिळेल, अशी अपेक्षा पक्षांने व्यक्त केली आहे. निश्चितच या जबाबदारीनंतर जलील यांचे नेतृत्व पक्षाला कितपत यश मिळवून देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.