औरंगाबाद- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे 1 मे रोजी होणाऱ्या सभेची जय्यत तयारी केली जात आहे. त्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून विविध भागांमध्ये निमंत्रण पत्रिका वाटत आहेत तर शहरात प्रत्येक रस्त्यावर झेंडे लावण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. इतर पक्षाच्या नेत्यांना सभेची परवानगी मग आम्हाला का नाही, असा प्रश्न मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर ( MNS District President Sumit Khambekar ) यांनी उपस्थित केला आहे.
सभा होणारच -मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या सभेला अद्याप पोलीस परवानगी मिळाली नाही. मात्र, परवानगी मिळाली नाही तर सांस्कृतिक क्रीडा मंडळवर त्या दिवशी होणारी गर्दी उत्तर देईन. पोलिसांनी सभेचा दिवस आणि स्थळ बदलण्याची विनंती केली असली तरी, सभा ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी, आणि ठरलेल्याच ठिकाणी होईल, असे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी सांगितले. सांस्कृतिक मैदानाला एक इतिहास आहे. त्या ठिकाणी मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांच्यासह इंदिरा गांधींच्या ( Indira Gandhi ) सभा तिथे झाल्या. अशा ऐतिहासिक ठिकाणी राज ठाकरे यांनी यापूर्वीही सभा घेतली आहे. त्यामुळे सभा तिथेच होईल, असे मनसे नेते बाळा नांदगावकर ( MNS Leader Bala Nandgaonkar ) यांनी सांगितले.