औरंगाबाद -विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील बहुतांश ठिकाणी मनसेच्या जिल्हा प्रमुखांनी बैठक घेऊन उमेदवारांची चाचपणी केली. औरंगाबादच्या कलश मंगलकार्यालयात मनसेचे नेते जावेद शेख यांच्या उपस्थित मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत औरंगाबादच्या नऊ विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.
औरंगाबादमध्ये मनसेकडून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांची चाचपणी करण्यात आली मंगळवारी मनसेच्या राज्यातील सर्व जिल्ह्याध्यक्षांची बैठक मुंबई येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजगड या निवासस्थानी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा लढवणार याबाबत चर्चा केली जाणार आहे.
हेही वाचा... मनसेचे इंजिन धडधडणार.. निवडक 100 जागेवर लढवणार निवडणूक ?
आगामी विधानसभा लढवण्याचा मनसुबा असलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सध्या आपल्या ताकदीची चाचपणी करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच मनसेने निवडणूक लढवावी की नाही, याबाबत कार्यकर्त्यांचा कौल जाणून घेण्यासाठी मंगळवारी राज्यातील मनसे जिल्ह्याध्यक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे.
मनसे जाणून घेणार कार्यकर्त्यांचा कौल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणूक लढवली नसली तरी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची पक्षाची परिस्थिती आणि इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहे. राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यातील चाचपणी करण्यात येत आहे. या चाचपणी नंतर मंगळवारी 24 सप्टेंबरला मनसेच्या सर्व जिल्ह्याध्यक्षांची आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीनंतर विधानसभेत किती जागांवर उमेदवार उभे करायचे हे ठरवणार असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा... भाजप घटक पक्षांना विचारात घेत नाही, विनायक मेटेंचा आरोप