औरंगाबाद - खासगी शाळांच्या मनमानी कारभाराविरोधात मनसे विद्यार्थी सेनेने जिल्हा परिषद समोर आंदोलन केले. कोविडच्या काळामध्ये काही खासगी शाळा मनमानी करत असल्याचा आरोप करत पालकांना आणि विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन केले. आंदोलनात विद्यार्थ्यांना सहभागी करू नये, अशा सूचना युती सरकारच्या काळात देण्यात आल्या होत्या. त्यात कोरोनाच्या महामारीची भीती असताना विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करण्याची गरज होती का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
मनसेने आंदोलन केला लहान मुलांचा वापर, कोविड काळात नियम धाब्यावर 'या आंदोलनात मनसेने लहान विद्यार्थ्यांना सहभागी केले. आंदोलन करताना या विद्यार्थ्यांना सहभागी करणे गरजेचे होते का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोविडच्या सावटाखाली जगात भीतीचे वातावरण आहे. शाळा बंद ठेऊन ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. लहान मुलांना कोरोनाचा होण्याचा धोका अधिक असल्याने मुलांना अनावश्यक बाहेर आणू नका, अशा सूचना केंद्र आणि राज्य सरकारने दिल्या आहेत. असे असताना आंदोलनासाठी मनसेच्या विद्यार्थी सेनेने विद्यार्थ्यांचा केलेले वापर कितपत योग्य आहे, हा खरा प्रश्न आहे,' असे सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -वाहून जाणाऱ्या इंदापूर नगरपालिका कर्मचाऱ्याचे नागरिकांनी 'असे' वाचविले प्राण
गेल्या काही दिवसांपासून खासगी शाळांबाबत तक्रारींमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. मुख्यतः खासगी इंग्रजी शाळा मोठ्या प्रमाणात वार्षिक शुल्क पालकांना आकारत आहेत. शाळा बंद असल्याने कॅन्टीन सुविधा, नृत्यकला क्लास, स्नेहसंमेलन, बसची सुविधा पालक घेत नाहीत. असे असले तरी काही खासगी शाळांनी या सर्व सुविधांचे शुल्क पालकांना आकारले आहे. जे पालक शुल्क देत नाहीत, त्यांच्या पाल्यांना ऑनलाइन क्लासपासून शाळा वंचित ठेवत आहेत. वारंवार पालकांनी शाळा प्रशासनाची भेट घेऊन हे शुल्क माफ करण्याची विनंती केली. मात्र, खासगी शाळा त्याला प्रतिसाद देत नाहीत.
जिल्हा परिषदला याबाबत विनंती अर्ज पालकांमार्फत सादर करण्यात आले. मात्र कुठलीही कारवाई होत नसल्याने मनसे विद्यार्थी सेनेने औरंगाबाद जिल्हा परिषद समोर आंदोलन केले. पालकांना आणि विद्यार्थ्यांना सोबत घेत हे आंदोलन करण्यात आले. 'विद्यार्थी शाळेच्या गणवेशात मुख्य गेट समोर हातात फलक घेऊन उभे राहिले. आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवू नका, शाळांवर कारवाई करा, अशा पद्धतीचे फलक या विद्यार्थ्यांच्या हातात देण्यात आले होते. आंदोलन करत असताना मागणी जरी योग्य असली तरी लहान विद्यार्थ्यांना आंदोलनात आणण्याची गरज काय होती, हा प्रश्नच आहे. लहान मुलांचा सहभाग असल्यावर आंदोलन चांगलं होईल, त्याची चर्चा होईल, अशी भूमिका जर असेल तर ही भूमिकाच मुळात चुकीची आहे. पालकांसोबतही आंदोलन करता आले असते, मात्र ग्लॅमर मिळवण्याच्या नादात विद्यार्थ्यांचे आरोग्य अडचणीत टाकणे कितपत योग्य,' असा सवाल करत मंगल खिवंसरा यांनी या आंदोलनांबाबत नाराजी व्यक्त केली. आंदोलन करताना काही नियम पाळले पाहिजे अशी टीका त्यांनी केली.
हेही वाचा -पावसाने पुण्यातील रस्ते जलमय; अनेक सोसायट्यांसह घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ