औरंगाबाद - शहरात पुन्हा एकदा नामांतरावरुन राजकारण रंगले आहे. शिवसेनेच्या 'सुपर संभाजीनगर'च्या डिस्प्लेबाजी नंतर मनसेने देखील या वादात उडी घेतली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराचे नामकरण संभाजीनगर करा अन्यथा मनसे जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी दिला आहे.
अधिक माहिती देताना आमचे प्रतिनिधी... शहरात मनसेची बॅनरबाजीऔरंगाबाद शहरातील प्रमुख रस्त्यांवर मनसेतर्फे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरद्वारे राज्य सरकारला इशारा देण्यात आला आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणार असे आश्वासन देत जनतेच्या भावनांशी खेळ करत मतदान घेतले. मात्र इतक्या वर्षात सत्तेत असूनही शहराचे नाव शिवसेनेने बदलले नाही. संभाजीनगरच्या मुद्द्यावरून नेहमी शिवसेना राजकारण करते. त्यामुळे आता मनसेने पुढाकार घेतला असून शहरात विविध ठिकाणी बॅनर लावून प्रजासत्ताक दिनाच्या शहराचा नामकरण करा अन्यथा मनसे जाब विचारेल, अशा आशयाचे बॅनर शहरात लावण्यात आले आहेत. त्यामुळे औरंगाबादेत पुन्हा संभाजीनगरच्या मुद्द्यावरून राजकारण तापणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे.शिवसेनेने लावले 'सुपर संभाजीनगर'चे डिस्प्लेस्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात काही डिस्प्ले लावण्यात आले. ज्यामध्ये लव औरंगाबाद, लव खडकी, लव प्रतिष्ठान असे डिस्प्ले लावण्यात आले. शिवसनेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी त्यांच्या सामाजिक संस्थेमार्फत शहरात 'सुपर संभाजीनगर' चे डिस्प्ले लावले. त्यावरून जिल्ह्यात पुन्हा संभाजीनगरचा मुद्दा चर्चेला आला. त्यावर एमआयएम प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर टीका करत महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर दोन दिवसांनी मनसेने शहरात संभाजीनगर बाबत बॅनर लावत वादात उडी घेतली आहे.