सिल्लोड- सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातील अस्वच्छता, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत अनियमितता आणि उपलब्ध आरोग्य सुविधा असतानाही रुग्णांना औरंगाबाद येथे रेफर करणे या कारणांवरून महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील वैदयकीय अधीक्षक आणि आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
सिल्लोड येथे आरोग्य अधिकाऱ्यांची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून झाडाझडती अब्दुल सत्तारांकडून अधिकऱ्यांचा समाचार
शुक्रवार ( दि.9 ) रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. या भेटीदरम्यान अब्दुल सत्तार यांनी रुग्णालयातील सर्व विभाग, मेडिकल स्टॉक, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी येथील अस्वच्छता, बंद अवस्थेत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथील अधिकाऱ्यांचा जोरदार समाचार घेतला.
'सरकारी रुग्णालये, मंदिरापेक्षा कमी नाही'
सामान्यांना आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी सरकार विविध योजना राबवित आहेत. सरकारी रुग्णालये म्हणजे मंदिरापेक्षा कमी नाही, असे स्पष्ट करीत यापुढे रुग्णालयातील अस्वच्छता व बेशिस्तपणा खपवून घेणार नाही, अशी तंबी देत कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर व सर्व सुविधा उपलब्ध असताना खासगी दवाखान्याचा रस्ता दाखविणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
पाहणी करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, युवानेते अब्दुल समीर, नगराध्यक्षा राजश्री निकम, तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे, न.प. तील शिवसेना गटनेते नंदकिशोर सहारे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सय्यद रफिक, उपमुख्याधिकारी अजगर पठाण, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हाजी मोहंमद हनिफ, दीपाली भवर, वैदयकीय अधीक्षक डॉ. अमित सरदेसाई, वैदयकीय अधिकारी डॉ. मोरे, डॉ. गायकवाड, डॉ. इंगोले, मोईन पठाण, डॉ.दत्ता भवर आदिंची उपस्थिती होती.
100 खाटांचा प्रस्ताव मंजूर
सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयाला 100 खाटांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने याबाबत अवश्यक व अधिक आरोग्य सुविधा तसेच रिक्त व वाढीव जागा भरण्याच्या दृष्टीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी बोलत असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथील शस्त्रक्रिया विभाग व सीसीटीव्ही यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करणे, कर्मचाऱ्यांच्या नियमित उपस्थितीसाठी बायोमेट्रिक मशीन बसविणे, गरजेनुसार पाचारण करण्यात येणाऱ्या खासगी तज्ज्ञ डॉक्टरांना नियमाप्रमाणे त्वरित मानधन अदा करणे, कोविड साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांच्या नियमीत तपासणी अभियान राबविणे व याबाबत उपाययोजना करणे, उपजिल्हा रुग्णालयातील सीसीटीव्ही यंत्रणा दुरुस्ती व गरजेनुसार काही कामे करण्यासाठी नगर परिषदेणे पुढाकार घ्यावा, अशा सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
हेही वाचा- Pankaja Munde : ...अन् वडिलांच्या आठवणीने पंकजा मुंडे गहिवरल्या