औरंगाबाद - राज्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण झाली. मुंबईत असताना त्यांना सौम्य लक्षण जाणवली होती. त्यामुळे त्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अब्दुल सत्तार यांना मुंबईत त्यांच्या बंगल्यात अलगिकरण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्याचे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. सत्तार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी दिली.
हेही वाचा -राज्यात आज आठ हजार नव्या रुग्णांसह २४६ मृत्यूंची नोंद; तर सात हजार रुग्णांना डिस्चार्ज..
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या सोशल साईटवर याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. कोरोनाची लागण झाली असली तरी कुठलीही लक्षणे नसल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना काळात अनेकांच्या भेटीगाठी झाल्या, अनेकांची मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान बाधा झाली असावी. मात्र, शुभचिंतकांच्या शुभेच्छामुळे लवकर बरा होईल. अशी माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडिया साईटवर दिली आहे. त्यांच्यावर मुंबईतच उपचार करण्यात येतील, अशी माहिती त्यांच्या स्वीयसहाय्यकाने दिली.
'या' मंत्र्यांना कोरोनाची लागण -
महाराष्ट्र हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. देशपातळीवर सर्वाधिक रुग्ण हे राज्यात आढळत आहेत. राज्य मंत्रिमंडळात यापूर्वी काही मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे पॉझिटिव्ह आढळले होते. यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधी झाली होती. या तिन्ही मंत्र्यांनी उपचारानंतर कोरोनावर यशस्वी मात केली. नुकताच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहेे.