औरंगाबाद- शहरातील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. जर आंदोलन करणाऱ्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतात. तर गर्दी करणारे भाजप नेते आणि कार्यकर्त्यावर पोलीस गुन्हा का दाखल करत नाहीत, असा सवाल जलील यांनी उपस्ठित केला आहे. दानवे यांच्या स्वागतावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी कोरोनाचे नियम मोडत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी जलील यांनी केली आहे.
भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा- खासदार जलील 15 ऑगस्टला एमआयएमने केले आंदोलन-
औरंगाबाद येथे प्रस्तावित असलेले क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याविरोधात एमआयएम पक्षाने 15 ऑगस्ट रोजी मुख्यध्वजारोहन सोहळ्यानंतर पालक मंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवले होते. त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी एमआयएम कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गुन्हा दाखल करा-
16 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे मराठवाड्यात दाखल आले होते. खातेबदल झाल्यावर त्यांचे जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेली गर्दी मोठ्या प्रमाणात होती. यावेळी या कार्यकर्त्यांनी कोविडच्या नियमांचे उल्लंघन केले. तसेच केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह कार्यकर्त्यांनी तोंडावर मास्क परिधान केले नव्हते. झालेल्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सचेही उल्लंघन झाले होते. यामुऴे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही? असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.