औरंगाबाद - सरकारने धार्मिक स्थळे सुरु केली नाहीत तर आम्ही करू, असा इशारा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी दिला. सरकारने सर्वच बाबतीत सूट दिली आहे, मग धार्मिक स्थळांना का नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. एक तारखेपासून मंदिर तर दोन तारखेपासून मशिद उघडावी असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
राज्य सरकारने धार्मिक स्थळे उघडावी, अन्यथा... - इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा
धार्मिक स्थळे नागरिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. कोणीही मंदिरात गेलं तर पाच मिनिटांच्या वर तो तिथे थांबत नाही. इतकंच नाही तर मशिदेत गेलेला व्यक्तीदेखील दहा मिनिटाच्या वर तेथे थांबत नाही. असे असताना देखील सरकारने धार्मिक स्थळे उघडण्यावर बंदी का घातली?' असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
हेही वाचा -कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मानवी चाचणी पुण्यात पडली पार
'कोरोनाच्या अनुषंगाने सरकारने काही निर्बंध लावले होते. मात्र, हळूहळू ते निर्बंध सरकारने उठवले, बाजारपेठा सुरू केल्या, दारूची दुकाने सुरू केली, इतकेच नाही तर लग्नसमारंभाला आधी पन्नास जणांची तर नंतर दोनशे जणांची परवानगी दिली. लग्नसोहळे करत असताना मंगल कार्यालयाची क्षमता बघून लोकांना बोलवावं असे देखील सांगण्यात आलं. मग धार्मिक स्थळांना बंदी का? असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. धार्मिक स्थळ सुरू करत असताना, आम्ही सर्व नियमांचे काटेकोर पालन करू. मंदिरांचे किंवा मशिदीच्या क्षमतेच्या पन्नास टक्केच भाविकांना आत प्रवेश देऊ. मात्र, राज्य सरकारने ही परवानगी द्यायला हवी. राज्य सरकार जर परवानगी देत नसेल तर आम्ही स्वतः धार्मिक स्थळ सुरु करू.' असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला दिला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी सरकारच्या निर्णयाची वाट न बघता एक सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या दिवशी हिंदू लोकांनी मंदिरे तर 2 सप्टेंबर पासून मुस्लिम लोकांनी मशिध उघडाव्यात असे आवाहन देखील केले आहे.
हेही वाचा -श्री अंबाबाई मंदिर सुरू करा, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची मागणी