औरंगाबाद - शहरातील बाराशेहून अधिक औषध दुकाने आणि 47 पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहेत. शहरातील प्रत्येक भागात अत्यावश्यक गरज म्हणून एक औषध दुकान सुरू असणार आहेत. तर शहरात असणारे थेट कंपनीमार्फत चालवले जाणारे दोन पेट्रोल पंप सुरू ठेवण्यात येणार आहेत. या पेट्रोल पंपावर शासकीय वाहने, महानगरपालिका वाहन कर्मचारी आणि पास धारकांसह अत्यावश्यक गरज असणाऱ्या नागरिकांनाच पेट्रोल मिळणार आहे. त्यामुळे बंद कडकडीत पाळण्यासाठी सर्वच स्तरातून पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.
औरंगाबादेत नऊ दिवसांच्या बंदमध्ये औषध दुकाने आणि पेट्रोल पंपही राहणार बंद हेही वाचा -रासायनिक खतांचा असाही दुष्परिणाम; ओडिशाच्या बरगढमध्ये आहेत सर्वाधिक कर्करोग रुग्ण..
औरंगाबाद जिल्ह्यात जनता कर्फ्युच्या माध्यमातून नऊ दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे. मार्च महिन्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊन 1 नंतर लावण्यात आलेल्या बंदमध्ये औषध दुकाने आणि पेट्रोल पंप सुरू ठेवण्यात आले होते. मात्र त्या काळात अनेक जण औषध आणण्याचे कारण देऊन बाहेर पडत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे यावेळच्या बंद मध्ये विनाकारण फिरणाऱ्या लोकांना बाहेर पडण्याचे कारण मिळू नये, यासाठी खबदरदारीच उपाय योजना म्हणून औषधी दुकानदार आणि पेट्रोल पंप चालकांनी या बंद मध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे शहरातील बाराशे औषध दुकाने आणि 125 ठोक विक्रेते यांनी बंदमध्ये सहभाग घेतला आहे.
दवाखाना हद्दीत असलेले औषधी दुकान आणि प्रत्येक भागातील अत्यावश्यक गरज म्हणून एक औषधी दुकान सुरू ठेवण्यात आल्याची माहिती केमिस्ट ड्रॅगीस्ट असोसिएशनचे सचिव विनोद लोहाडे यांनी दिली. तर शहरातील 47 पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहेत. अत्यावश्यक गरज म्हणून थेट कंपनी मार्फत सुरू असलेले दोन पेट्रोल पंप सुरू ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती पेट्रोल असोसिएशन तर्फे देण्यात आली आहे.