औरंगाबाद- शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत अल्प असल्याचे मत अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले आहे. राज्यात ओला दुष्काळ पडला असून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. लवकरच सरकार स्थापन होईल आणि शेतकऱ्यांना मदत मिळेल, असा विश्वास मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केला.
मकरंद अनासपुरे - ज्येष्ठ अभिनेते हेही वाचा -साध्वी प्रज्ञांकडे तारक मारक अस्त्र; म्हणून त्यांची संरक्षण समितीवर निवड
राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही अनेक ठिकाणी आमच्यापरीने कामं करत आहोत. शेतकऱ्यांना मदत तातडीने देण्याचे काम प्रशासनाच आहे. त्यांनी मदत केल्यास शेतकऱ्यांना मदत होईल, असे देखील मकरंद अनासपुरे यांनी औरंगाबादेत सांगितले.
'नाम'ने पश्चिम महाराष्ट्रात 500 कुटुंबासाठी काम सुरु केले आहे. नाम सारख्या अनेक संस्था पुढे आल्या आहेत. शासकांची जबाबदारी असते. त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतले तर शेतकऱ्यांच्या समस्या दूर होऊ शकतात. त्यामुळे शासनाने तसे निर्णय घेतले पाहिजे. आज हेक्टरी आठ हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ही मदत खूप कमी आहे. अनेक द्राक्षे बागायत शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे केलेला खर्च पाहता ही मदत खूपच कमी आहे. शासनाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता तातडीने मोठी मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे, असे मत ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले.
राज्यात राष्ट्रपती राजवट असल्याने राज्यपालांनी शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजारांची मदत जाहीर केली. त्या मदतीवर अनेकांनी टीका केली. मात्र, लवकरच सरकार स्थापन होईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अशा मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली.