औरंगाबाद -बाल विवाह ( Child Marriage ) थांबवण्यासाठी सरकारतर्फे अनेक उपाय योजना केल्या जातात. मात्र, त्या उपायोजना फोल ठरत असल्याचं समोर येतंय. कारण, आजही बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे. राज्यात पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील ( Child Marriage In Marathwada ) आठही जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यात परभणी जिल्हा राज्यात क्रमांक एकवर आहे.
बाल विवाहावर महिला अभ्यासक मंगल खिवंसरा यांचे मत... कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून समोर आली माहिती -
दिवसेंदिवस जग बदलत चाललंय, लोक शिक्षित होत आहेत. त्यामुळे समाजात खूप मोठा बदल होतोय, असे वारंवार बोलले जाते. त्यातच बालविवाह आता होत नाहीत, असा समज निर्माण झाला होता. मात्र, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणमधून ( National Family Health Survey ) काही माहिती समोर आली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलींचे विवाह अजूनही सुरूच आहेत. त्यात हे प्रमाण मराठवाड्यात अधिक असून पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा समावेश असल्याचं दिसून आलं.
परभणी जिल्हा राज्यात बालविवाहात अग्रणी -
बाल विवाहाच्या बाबतीत 2019 - 20 या कालावधीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात परभणी या जिल्ह्यात सर्वाधिक बालविवाह झाले आहेत. तर दुसरा नंबर बीडचा लागला आहे. मराठवाड्याच्या विचार केला तर पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये मराठवाड्याचे आठही जिल्ह्यांचा समावेश असल्याचा या अहवालातून समोर आला आहे.
चौथ्या आणि पाचव्या या दोन सर्व्हे नुसार....
परभणी 45- 48
बीड 52- 43
धुळे 35 -40
सोलापूर 37 -40
हिंगोली 41 -38
उस्मानाबाद 31- 37
औरंगाबाद 45- 36
जालना 50- 35
नांदेड 42 -34
लातूर 37 -33 , असे विवाह झाले आहेत.
समाजात असुरक्षितता असल्याने बाल विवाह अधिक -
जगात वावरत असताना महिला असुरक्षित असल्याच्या घटना वारंवार घडत असतात आणि त्यामुळेच मुलगी वयात आली की तिचं लग्न लावून जबाबदारी तिच्या नवऱ्यावर सोडून द्यायची, असं एकंदरीत चित्र समाजात दिसून येते अशी माहिती महिला अभ्यासक मंगल खिवंसरा यांनी दिली. बालविवाह थांबविण्यासाठी अनेक उपाय योजना सरकारकडून केल्या जातात. मात्र, या उपाययोजनांचा उपयोग होताना दिसत नाही. यावर आणखी काही पर्याय शोधले पाहिजे, मुलींना किमान बारावीपर्यंत शिक्षण सक्तीचे केल्यास मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढेल आणि त्याचबरोबर वयाची त्यांची अठरा वर्ष देखील पूर्ण होऊ शकतात, अशी सक्ती केली तर नक्कीच बालविवाह थांबवण्यात मोठा हातभार लागू शकतो, असे मत महिला अभ्यासक मंगल खिवंसरा ( Mangal Khivansara ) यांनी व्यक्त केलं.
लग्न लावताना काही प्रमुख कारण दिली जातात, ज्यामध्ये घरातील वृद्धांना नातीचे लग्न बघायचे आहे. कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एक वर्षात विवाह लावावा लागेल नाही. तर तीन किंवा पाच वर्षे जमणार नाही अस सांगितलं जातं. मात्र, मुळात यात मुलींवर अन्याय होत आहे, याबाबत कोणीही विचार करायला तयार नाही, अस देखील मंगल खिवंसरा यांनी सांगितले.