औरंगाबाद - मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठच्या सुमारास सुरुवात झाली. चिकलठाणा परिसरात या मतमोजणीला सुरुवात झाली असून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण की भाजपचे शिरीष बोराळकर दोघांमध्ये बाजी कोण मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीचे निकाल आज रात्री किंवा उद्या पहाटेपर्यंत लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
३५ उमेदवार रिंगणात -
मतमोजणीसाठी 507 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या मतदारसंघातून 35 उमेदवार नशीब आजमावत आहेत. पाच फेऱ्यांमध्ये हे मतदान होईल. मतमोजणीसाठी दोन हॉलमध्ये 56 टेबल लावण्यात आले आहेत. उमेदवाराचा कोटा निश्चित करण्यासाठी अवैध मत किती असतील त्यावर तो ठरणार आहे. सुरुवातीला मतपत्रिका एकत्र करण्यात येतील, त्यानंतर 25 - 25 चे गठ्ठे तयार करून त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल.
निकाल लांबण्याची शक्यता -
मतमोजणी केंद्रात येणाऱ्या उमेदवार प्रतिनिधींची तपासणी करून त्यांना प्रवेश दिला जात आहे. मुख्य प्रवेश द्वार आणि मतमोजणी कक्ष बाहेर प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. ऑक्सिमिटर आणि थर्मलगनचा वापर करूनच मतमोजणी केंद्रात उमेदवार प्रतिनिधींना आत सोडण्यात आले. पहिल्या फेरीत कोटा पूर्ण झाला तर रात्री उशिरा निकाल लागेल. मात्र पहिल्या फेरीत निकाल लागला नाही तर मतमोजणीची दुसरी फेरी होईल. दुसऱ्या फेरीत मतमोजणी गेली तर उद्या सकाळ पर्यंत हा निकाल लागेल अशी शक्यता आहे.