महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 23, 2020, 4:20 PM IST

Updated : Jun 23, 2020, 9:56 PM IST

ETV Bharat / city

लॉकडाऊन इफेक्ट; पगार कमी झालेल्या शिक्षिकेची सावकारी त्रासामुळेच आत्महत्या, सुसाईड नोटमधून उघड

प्रतीक्षा काळे आपल्या वडिलांची लाडकी लेक, उच्चशिक्षित आणि हुशार असलेल्या प्रतीक्षाला नुकतीच एका शाळेत नोकरी मिळाली होती. वडील भरत काळे एका वृत्तपत्रात मार्केटिंगचे काम करत होते. आर्थिक अडचण असल्याने त्यांनी सावकाराकडून ४० हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यानंतर . . . .

aurangabad
आत्महत्या केलेली शिक्षिका

औरंगाबाद- लॉकडाऊनमुळे शाळेने वेतन कमी केल्यामुळे सावकारी कर्जाचे व्याज देणे अशक्य झालेल्या शिक्षिकेने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. ही धक्कादायक घटना औरंगाबादेतील सिडको परिसरात घडली. प्रतीक्षा भरत काळे असे ( वय 25 वर्षे ) आत्महत्या केलेल्या शिक्षिकेचे नाव असून तिने 18 जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली.

लॉकडाऊन इफेक्ट; पगार कमी झालेल्या शिक्षिकेची सावकारी त्रासामुळेच आत्महत्या, सुसाईड नोटमधून उघड

मानसिक तणावातून प्रतीक्षाने आत्महत्या केली असावी, असे सुरुवातीला वाटत असताना तीन दिवसांनी तिची सुसाईड नोट मिळाली. त्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आले. पोलिसांनी व्याजासाठी छळणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला असून त्यापैकी एकाला अटक केली आहे. एकजण आजारी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने अद्याप त्याला अटक झाली नसल्याची माहिती सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.

प्रतीक्षा काळे आपल्या वडिलांची लाडकी लेक, उच्चशिक्षित आणि हुशार असलेल्या प्रतीक्षाला नुकतीच एका शाळेत नोकरी मिळाली होती. वडील भरत काळे एका वृत्तपत्रात मार्केटिंगचे काम करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची नोकरी गेल्याने कुटुंबाचा गाडा आर्थिक चणचणीत अडकला होता. त्यामुळे त्यांनी एका सावकाराकडून महिन्याला दहाटक्के व्याजाने चाळीस हजार रुपये घेतले होते. प्रतीक्षाला नोकरी मिळाल्याने त्यातून व्याज दिले होते.

वसुलीसाठी सावकाराचा घरी येऊन तगादा . . .

कोरोनामुळे शाळा सुरू होण्याबाबत प्रश्न उभा राहिला आणि शाळेने वेतन कपात केली. त्यामुळे सावकारी व्याज देणे शक्य झाले नाही. त्यात सावकाराने व्याजाच्या पैश्यांसाठी सतत तगादा लावला. काही दिवसांपूर्वी सावकार वसुली करायला एका व्यक्तीला घेऊन काळे यांच्या घरी आला. व्याज दिले नाही, म्हणून मुलीची दुचाकी घेऊन गेला. 18 जून रोजी पैसे देण्याचा अवधी त्याने दिला. 18 जूनला सकाळी सावकाराने दोनदा फोन करून पैसे देण्याचे स्मरण करून दिले. दुपारी दोनपर्यंत पैसे देण्याचा वायदा होता. तरी सकाळी अकराच्या सुमारास सावकार आणि त्यांचा मित्र दारू पिऊन काळे यांच्या घरी येऊन धमकी देऊन गेले. वडील भारत काळे यांनी त्यांच्या मित्राला मदत मागितली होती. तो मित्र मदत करायला देखील तयार झाला होता. मात्र दुपारी त्यांचा फोन लागत नसल्याने आता सावकार घरी पुन्हा येईल, याची भीती कुटुंबीयांना होती.

अशी घडली घटना . . . .

शाळा बंद असल्याने प्रतीक्षा ऑनलाईन पद्धतीने शिकवत होती. तिने रोज सारखा तिचा ऑनलाईन वर्ग घेतला. दुपारी काही व्हिडिओ तयार करायचे असल्याचे कारण सांगून ती मधल्या खोलीचा दरवाजा बंद करुन आत जाऊन बसली. थोड्यावेळाने वडिलांनी दरवाजा वाजवला, त्यावेळी दहा मिनिटात काम होईल, असे ती म्हणाली. मात्र बराच वेळ झाला, तरी ती बाहेर न आल्याने वडिलांना शंका आली. त्यांनी दरवाजा वाजवला आतून आवाज न आल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना बोलावून आणले. पोलिसांनी दरवाजा तोडला असता प्रतिक्षाने फाशी घेतल्याचे समोर आले. कमी झालेले वेतन आणि आर्थिक चणचण यामुळे मानसिक दबावातून तिने आत्महत्या केल्याचे सर्वांना वाटत होते.

असे फुटले सावकारी जाचाचे बिंग . . .

पोलिसांनी दोन दिवसांनी तिचे साहित्य तपासले असता, तिची सोसाईड नोट पोलिसांना आढळली आणि सावकारांनी सतत लावलेल्या तगाद्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे समोर आले अशी माहिती प्रतिक्षाचे वडील भरत काळे यांनी दिली. त्यामुळे सिडको पोलिसांनी दोन सवकारांविरोधात गुन्हा दाखल करून त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याने अद्याप त्याला अटक झाली नसल्याची माहिती सिडकोचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली. वेतन कमी झाल्याने बिघडलेल्या आर्थिक चक्रामुळे प्रतिक्षाला आत्महत्या करण्याचे पाऊल उचलावे लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Last Updated : Jun 23, 2020, 9:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details