औरंगाबाद - घरात एखाद्या भिंतीवर गणपतीचे चित्र काढलेले अनेक ठिकाणी आपण पाहिले असेल. मात्र, घरातील प्रत्येक भिंतीवर फक्त गणपती बाप्पाचेच चित्र साकारल्याच कधी पाहायला मिळणार नाही. मात्र औरंगाबादच्या कोरडे या गणेशभक्त दाम्पत्याने आपल्या घराच्या प्रत्येक भिंतीवर बाप्पाचे विविध रूप साकारले आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही चित्रकार किंवा रंगकाम करणाऱ्या व्यक्तीची मदत न घेता स्वतःच त्यांनी बाप्पाची ही रूपे साकारली आहेत.
भिंतीवर बाप्पाची विविध रुपे औरंगाबादच्या विलास कोरडे यांच्या कुलस्वामिनी प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी पर्यावरण पूरक गणपती साकारत गणेशभक्ती केली जाते. मात्र, यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने वेगळ्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करण्याचा निश्चय त्यांनी केला. त्यानुसार आपल्या घराच्या भिंतींवर बाप्पाची विविध रुपे साकारण्याचा त्यांनी विचार केला आणि त्यानुसार दोन महिने आधी बाप्पांची रुपे साकारायला सुरुवात केली. आणि दोन महिन्यात तब्बल 41 चित्र रेखाटले.
हेही वाचा -सुखकर्ता.. दु:खहर्ता... मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील आरती
कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. या लॉकडाऊनमध्ये अनेकांनी आपल्यात दडलेल्या कौशल्यांना वाव देण्याचा प्रयत्न केला. काहींनी स्वयंपाक करण्याचे तर काहींनी आयुष्यात वेळ नसल्याने अपूर्ण राहिलेले छंद जोपासण्याचा प्रयत्न केला. असाच काहीसा प्रयत्न औरंगाबादेत व्यावसायिक असलेल्या कोरडे दाम्पत्याने केला. लॉकडाऊनमध्ये कुठे बाहेर जाणे टाळून त्यांनी गणेश भक्ती करण्याचा निर्णय घेतला. यासह स्वतःतील चित्रकालेला वाव देत त्यांनी घरातील भिंतींवर बाप्पाचे विविधरूप साकारण्याचा निर्णय घेतला.
दोन महिन्यांमध्ये रोज थोडा थोडा वेळ देऊन त्यांनी आपल्या घरात बाप्पांची विविधरुपे साकारण्यास सुरुवात केली. अष्टविनायक मूर्तींपासून सुरुवात केल्यानंतर कृष्णासोबत लोणी खाणारा बाप्पा, कार्तिकेसोबत मोरावर जाणार गणपती, ढोल वाजवणारा बाप्पा, झाडांना पाणी देणारा बाप्पा, प्रसाद देणारा बाप्पा असे जवळपास बाप्पांच्या 41 विविध छटा साकारल्या. गेल्या काही वर्षांपासून विलास कोरडे कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करतात. विविध सामाजिक उपक्रम राबवत जनजागृती देखील करण्याचे काम कोरडे यांनी केले. लॉकडाऊनमध्ये देखील आपल्या घराच्या बाहेर न पडता पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश या चित्रांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न विलास कोरडे यांनी केला. बाप्पांच्या या अनोख्या घराचा आढावा घेत विलास आणि अलका कोरडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.
हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती