औरंगाबाद -आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान यावरून भाजप नेते किरीट सोमैया यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान अनिल देशमुख गेले, आता अनिल परब तयारीला लागले असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
सचिन वाझे प्रकरणात दोन हजार कोटींपेक्षा अधिक वसुली झाल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. वसुली गॅंगने बुकीकडून हप्ता वसुली केली. पोलिसांच्या बदल्यांमध्ये देखील घोटाळा झाला. अस्तित्वात नसलेल्या वाहिन्या दाखवून टीआरपी घोटाळा केला. या सर्वांचे लाभार्थी केवळ अनिल देशमुख हे नव्हते, तर अनिल परब हे गृहनिर्माण सोबत गृह खाते देखील चालवत होते. त्यामुळे आता अनिल परब यांनी देखील तयारी करावी असं सोमैया यांनी म्हटले आहे.
सचिन वाझे प्रकरणात दोन हजार कोटींपेक्षा अधिक वसुली 'मुख्यमंत्र्यांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न'
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र खरं सत्य लवकरच बाहेर येणार आहे. सचिन वाझे यांनी किती रुपयांची खंडणी वसूल केली, वसुलीतील पैसा कुठे गेला? राष्ट्रवादीकेड किती गेला, शिवसेनेकडे किती गेला, याचा तपास लवकरच लागेल असेही त्यांनी यावेळी म्हटले.
'औरंगाबादमध्ये केवळ 110 व्हेंटिलेटर कार्यरत'
औरंगाबादेत सहा महिने आधी काम देऊन देखील, लिक्विड ऑक्सिजन लावण्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे अनेकांचे जीव गेले, याला जबाबदार कोण? असा सवालही यावेळी किरीट सोमैया यांनी केला. औरंगाबादमध्ये मेडिकल वेस्टचा प्रश्न प्रलंबित आहे. 500 व्हेंटिलेटरची मागणी होती, प्रत्यक्षात आले 142, त्यापैकी 110 च चालू आहेत. वाझे प्रकरणात व्यस्त असलेल्या ठाकरे सरकारला इकडे लक्ष देण्यास वेळ मिळेल का? अशी टीका यावेळी सोमैया यांनी केली आहे.
हेही वाचा -परमबीर सिंग यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी, १५ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश