औरंगाबादमध्ये ब्रिटनहून आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह, तर १३ जणांचा लागेना पत्ता - औरंगाबाद महापालिका
राज्य सरकारच्या निर्देशानुसार औरंगाबाद महापालिकेने ब्रिटन येथून आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण सुरु केले आहे. आतापर्यंत ४४ नागरिक ब्रिटनमधील लंडनमधून शहरात दाखल झाले आहेत.
औरंगाबाद - ब्रिटनहून औरंगाबादमध्ये दाखल झलेली ५७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. या महिलेला ब्रिटनमधील नव्या कोरोनाच्या प्रकाराची लागण झाली का?, याच्या तपासणीसाठी या महिलेच्या घशातील स्राव पुण्याला पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे औरंगाबादकरांच्या चिंतेत भर पडली आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार औरंगाबाद महापालिकेने ब्रिटन येथून आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण सुरु केले आहे. आतापर्यंत ४४ नागरिक ब्रिटनमधील लंडनमधून शहरात दाखल झाले आहेत. यातील एका ५७ वर्षीय महिलेची गुरुवारी कोरोना चाचणी केली होती. तिचा अहवाल शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले.
बाधित महिला १५ डिसेंबर रोजी आली भारतात-
कोरोना बाधित महिला १५ डिसेंबर रोजी ब्रिटन येथून शहरात दाखल झाली. या महिलेने गुरुवारी सकाळी बन्सीलालनगर येथील आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करुन घेतली. आज या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेला नवीन कोरोना विषाणूची लागण झालेली आहे किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी महिलेच्या घशातील स्राव पुणे येथील राष्ट्रीय विषाणूजन्य प्रयोगशाळेत पाठविले आहेत, असे आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
आजवर ४४ नागरिक ब्रिटनहून शहरात-
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार, ब्रिटनहून ४४ प्रवासी औरंगाबादेत दाखल झाले आहेत. २५ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर या काळात हे प्रवासी आले असून त्यापैकी ११ जणांची आरटीपीसीआर पध्दतीने कोरोना चाचणी केली. ही महिला वगळता सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यातील काहीजण परत देखील गेले असून काही बाहेरच्या जिल्हयातील आहेत. शहरात आलेल्या नागरिकांची माहिती घेवून त्यांच्याशी संपर्क केला जात आहे.
बाहेर देशातून आलेले 13 जण सापडेना-
ब्रिटनमधून औरंगाबाद शहरात आलेले १३ प्रवाशांचा पत्ता लागत नाही आहे. या ‘बेपत्ता’ प्रवाशांचा शोध घेण्यासाठी आता महापालिका प्रशासनाने पोलिसांची मदत मागितली आहे. हे १३ जण नेमके कुठे बेपत्ता झाले आहेत. याचा शोध घेतला जात आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरामुळे जगभराची चिंता वाढली आहे. हा नवीन कोरोना आधीच्या कोरोना विषाणूपेक्षा ७० टक्क्यांहून जास्त वेगाने संक्रमित करतो. त्यामुळेच राज्य सरकारच्या निर्देशानुसार २५ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर या कालावधीत ब्रिटनहून औरंगाबादेत दाखल झालेल्या नागरिकांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीवर आधारित हे सर्वेक्षण सुरू आहे. आतापर्यंत शहरात आलेल्या ४४ प्रवाश्यांपैकी ६ नागरिक परत परदेशात गेले आहेत. एक जण मुंबईतच क्वारंटाईन आहे. तर १३ नागरिकांचा शोध लागेनासा झाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन-
नवा विषाणू झपाट्याने वाढतो, अशी माहिती असल्याने देशात या विषाणूचा फैलाव होऊ नये, यासाठी देशातील सर्वच शहरांमध्ये काळजी घेतली जात आहे. त्यामुळे जे प्रवासी मागच्या काही दिवसांपूर्वी इंग्लंडहून प्रवास करून आलेले आहेत. त्यांनी स्वतःहून जिल्हा प्रशासन तसेच महापालिका प्रशासनाला कळवावे. तसेच त्यांनी स्वतःची आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.
हेही वाचा-एकनाथ खडसेंना 'ईडी'ची नोटीस? भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी बुधवारी चौकशीची शक्यता