औरंगाबाद -राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत नवीन निर्बंध लावत अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध करत आजपासून व्यवसाय सुरू करण्याची भूमिका घेतली, मात्र त्यामुळे संभ्रम निर्माण झाल्याचे औरंगाबादेत पाहायला मिळालं. व्यापारी संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली मात्र पोलिसांनी तातडीने ती बंद देखील करायला लावली.ऑनलाईन व्यवसाय बंद करा..
राज्य सरकारने बाजारपेठ बंद केल्या असल्या तरी ऑनलाईन व्यवसाय मात्र सुरूच आहे. छोट्या वस्तूंपासून ते मोठ्या वस्तूंपर्यंत सर्वच गोष्टी ऑनलाइन पुरवल्या जात आहेत. त्यामुळे गरीब व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. सरकारने सर्व बाजारपेठा बंद केल्या असल्यातरी मागील बाजूने चोरटा व्यापार सुरूच ठेवला आहे. त्याचबरोबर होम डिलिव्हरी देणाऱ्यांची कोरोना चाचणी केलेली नसते. त्यांच्या माध्यमातून आजाराचा प्रसार होत नाही का? असा प्रश्न व्यावसायिकांनी उपस्थित केला. राज्य सरकारने केलेले धोरणच चुकीचे असल्याने जोपर्यंत ऑनलाइन व्यापार बंद होत नाही, तोपर्यंत व्यावसायिक सरकारला मदत करणार नाहीत. अशी भूमिका औरंगाबाद व्यापारी महासंघाने घेतली आहे.