औरंगाबाद - कोरोनाच्या संकटात पोलिसांना नागरिकांचीच नव्हे तर कैद्यांचीही काळजी घ्यावी लागत आहे. हत्येच्या प्रकरणातील एका कैद्याने घाटीतून उपचारादरम्यान छातीत दुखत असल्याचा नाटक केले. त्याला वाचवण्यासाठी पोलीस डॉक्टरांना बोलावण्यासाठी गेले. ही संधी साधून आरोपीने धूम ठोकल्याची घटना आज घाटीतील रुग्ण कक्ष १३ मध्ये घडली. इम्रान अमीर बेग (वय ३२ रा. काबरानगर, गारखेडा परिसर) असे त्याचे नाव आहे. हर्सुल कारागृह पोलिसांच्या हातून कैदी पळून जाण्याची ही दुसरी घटना आहे.
हर्सुल कारागृहातील २९ कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांना किलेअर्क येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतीगृहाच्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते. कारागृह पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ७ जून रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास खून आणि बनावट नोटा प्रकरणातील दोन आरोपींनी पळ काढला होता. सिटीचौक पोलिसांनी त्यापैकी एकाला अटक केली आहे. मात्र, दुसरा आरोपी फरार आहे. असे असतानादेखील शुक्रवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास घाटीच्या वॉर्ड क्र. १३ मध्ये उपचार घेत असलेल्या इम्रान अमीर बेग या कैद्यानेही धुम ठोकली.