वैजापूर (औरंगाबाद) - वैजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुक्रवारी (ता.११) आपल्या कॅबिनमध्ये बसलेले असताना खुलताबादच्या एका दांपत्याने कॅबिनचा आतून दरवाजा बंद करुन स्क्रू ड्रायव्हर व कटरने गटविकास अधिकारी (बीडीओ) डॉ. ज्ञानोबा मोकाटे यांना मारहाण केली. त्यामुळे मोकाटे यांनी आरडाओरड केल्याने इतर कर्मचारी व सदस्यांनी कॅबिनचा दरवाजा तोडून त्यांची सुटका केली. या घटनेनंतर पंचायत समितीच्या आवारात मोठी गर्दी जमली होती. वनमाला विजय शेखर (वय ३०), विजय शेखर (वय ३७) असे मारहाण करणाऱ्या पती-पत्नीचे नाव असून ते खुलताबाद येथील रहिवासी आहेत.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मोकाटे भयभीत
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गटविकास अधिकारी शुक्रवारी बारा वाजता आपल्या कॅबिनमध्ये पंचायत समितीचे सदस्य रविराज कसबे यांच्यासोबत चहा घेत होते. यावेळी खुलताबाहेतील हे दाम्पत्य बीडीओ यांच्या कॅबिनमध्ये प्रवेश करुन साहेबासोबत एकांतामध्ये आम्हाला बोलायचे सांगून कॅबिनमध्ये बसलेले सदस्य कसबे व शिपाई इमरान यांना बाहेर जाण्याची विनंती केली. महत्त्वाचे काम असेल यामुळे कॅबिनमधून कसबे बाहेर निघून गेले. त्यावेळी या दांपत्याने कॅबिनचा आतून दरवाजा बंद करत सरळ बीडीओ मोकाटे यांच्यावर स्क्रू ड्रायव्हर व कटरने मारहाण करायला सुरू केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मोकाटे भयभीत होऊन जोर-जोराने बचावसाठी ओरडत होते. यावेळी मदतीसाठी सदस्य व कर्मचारी मोकाटे यांना वाचविण्यासाठी त्यांच्या कॅबिनकडे धावले. मात्र कॅबिनचा दरवाजा आतून बंद असल्याने सदस्य कसबे यांनी दरवाजा तोडून कॅबिनमध्ये प्रवेश केला. त्यावेळी बीडीओ जमिनीवर खाली पडलेले होते. तर दांपत्य त्यांना स्क्रूड्रायव्हर व कटरने बेदम मारहाण करत असल्याचे सदस्यांनी सांगितले. यावेळी बीडीओ यांच्या डोक्यातून रक्त निघत होते. उपस्थित लोकांनी घटनास्थळी वैजापूर पोलिसांना बोलावून मोकाटे यांना तातडीने दवाखान्यात उपचारासाठी पाठविले. या घटनेची सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात कोणीच तक्रार केली नसल्याने या प्रकरणाची तालुक्यात उलट-सुलट चर्चा नागरिकांमध्ये रंगली.