औरंगाबाद - नातेवाईकांना भेटण्यासाठी लाहोरला गेल्यावर पासपोर्ट हरविल्यामुळे तुरुंगवासात गेलेल्या एक 65 वर्षीय आजी तब्बल 18 वर्षांनंतर मायभूमीत परतल्या आहेत. हसीना दिलशाद अहमद असे या आजींचे नाव असून औरंगाबादमध्ये त्या दाखल झाल्या आहेत. देशात परतल्यानंतर अतिशय समाधान वाटत असल्याचे या आजींनी म्हटले आहे.
पाकिस्तानी तुरुंगातून 18 वर्षांनी मुक्तता, 65 वर्षीय आजी औरंगाबादेत परतल्या 2002 मध्ये गेल्या होत्या पाकिस्तानात
हसीना यांचा विवाह उत्तर प्रदेशातील सहारनपूर नबाब का किला येथील दिलशाद अहमद यांच्याशी झाला होता. यानंतर त्या 2002 मध्ये पाकिस्तानातील नातेवाईकांना भेटण्यासाठी लाहोरला गेल्या होत्या. मात्र ते नातेवाईक त्यांना भेटलेच नाही. यानंतर त्या लाहोर शहरात भटकत राहिल्या. याच दरम्यान त्यांचा पासपोर्ट हरविला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना संशयित घोषित करून तुरुंगात टाकले. आता तब्बल 18 वर्षांनी त्यांची सुटका झाली आहे.
20 डिसेंबरला झाली सुटका
हसीना यांची 20 डिसेंबर रोजी पाकिस्तानातील तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर त्या अमृतसरमध्ये दाखल झाल्या. येथील गुरू नानकदेव रुग्णालयाच्या धर्मशाळेत त्या मुक्कामाला होत्या. यानंतर अमृतसर पोलिसांनी हसीना यांच्याकडून माहिती घेत त्यांचे भाचे जैनुद्दीन चिश्ती यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना औरंगाबादला पोहोचविले.
हसीना अहमद यांच्याशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी संवाद साधला औरंगाबाद स्थानकावर नातेवाईकांकडून स्वागत
हसीना दिलशाद अहमद यांचे औरंगाबाद रेल्वे स्थानकावर त्यांच्या नातेवाईकांनी जंगी स्वागत केले. यावेळी पोलिसांनीही हसीना यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पाकिस्तान मधला अनुभव सांगताना हसीना स्तब्ध होत्या. आपण कसे अडकलो कशा पद्धतीने आपल्याला तुरुंगवास झाला याबद्दल विचारले असता, माझ्यावर खूप अन्याय झाला, आज आपल्या देशात आल्यानंतर मला स्वर्गात आल्याचा अनुभव झाल्याचे हसीना म्हणाल्या.
हेही वाचा -बलांगीरचा 'वंडरबॉय' : सात वर्षांचा कोडिंग तज्ज्ञ; बनवलेत १५०हून अधिक अॅप्स..