औरंगाबाद- लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी भगवान महासंघाच्या जिल्हाध्यक्षाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना औरंगाबादेतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज घडली. सचिन डोईफोडे असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे शहरात भव्य स्मारक व्हावे आणि त्यातून तरूणांनी प्रेरणा घ्यावी, यासाठी तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शहरातील शासकीय दूध डेअरीची जागा दिली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्या समक्ष स्मारकाची जागा निश्चित करून निधीसाठीचा प्रस्तावही सरकारकडे पाठवला होता. मंत्रिमंडळ बैठकीत देखील या प्रस्तावाला मान्यता देऊन निधी देखील देण्यात आला. परंतु त्यानंतर मात्र स्मारकाचे काम रखडल्याचा आरोप जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष सचिन डोईफोडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केला आहे.