औरंगाबाद - बुद्ध पौर्णिमेच्या रात्री टपोरे चांदणे आणि चंद्राच्या लख्ख प्रकाशात कन्नड़ तालुक्यातील गौताळा अभयारण्यात दरवर्षी वन्यविभागाच्या प्राणी गणना करण्यात येते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही प्राणी गणना रद्द करण्यात आली आहे.
हेही वाचा...औरंगाबाद दुर्घटना : शाहडोलमधील गावावर पोहोचली शोककळा..
गौताळा अभयारण्यात २२ हजार हेक्टर क्षेत्रातील ५० पाणवठे आणि १० नैसर्गिक पाणवठे आहेत. गौताळा अभयारण्यात कन्नड रेंजमधील १० हजार ५०० हेक्टर क्षेत्रामध्ये २१ पाणवठे, नागद रेंजमधील ८ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये २२ पाणवठे, तर पाटणादेवी रेंजमधील ६ हजार हेक्टर क्षेत्रात १८ पाणवठे तयार करण्यात आले आहे.
अभयारण्यातील या सर्व पाणवठ्यावर वन्यजीव विभागाने ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे बुद्ध पौर्णिमे दिवशी प्राण्यांचे प्रत्यक्ष दर्शन जरी झाले नसले तरीही, बिबट्या, मोर, साळींदर, नीलगाय, हरीण, कोल्हा, तडस, ससे, सांबर, रानडुक्करांचे कळप हे प्राणी पाणवठ्यावर लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. यावर्षी लॉकडाऊनमुळे अभयारण्यात पर्यटन बंद आहे. सहाजिकच वाहनांची वर्दळ नसल्यामुळे प्राण्यांचा मुक्त संचार ट्रॅप कॅमेऱ्यात पहावयास मिळला असल्याचे वनक्षेत्रपाल राहुल शेळके यांनी सांगितले.