औरंगाबाद -महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार गणेशोत्सव सातासमुद्रापार देखील त्याच उत्साहात साजरा केला जातो. नॉर्थ आफ्रिकेत राहणारे फासाटे कुटुंब गेल्या अकरा वर्षांपासून बाप्पाची स्थापना करतात. तेव्हा भारतीय संस्कृती पाहण्यासाठी तेथील नागरिक आवर्जून येतात असे रचना फासाटे यांनी सांगितले.
नॉर्थ आफ्रिकेत फासाटे कुटुंबीयांचा गणेशोत्सव फासाटे कुटुंब गेल्या अकरा वर्षांपासून राहते मोरोको शहरात -
श्रीरामपूर येथील प्रकाश फासाटे त्यांच्या पत्नी रचना आणि मुलगा निसर्ग गेल्या अकरा वर्षांपासून मोरोको येथे राहतात. प्रकाश फासाटे हे एका औषधी कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. विदेशात राहत असले तरी तिथे देखील मोठ्या उत्साहात भारतीय सण साजरे करतात. त्यात गणेश उत्सव म्हणले की उत्साह काही वेगळाच असतो. मोठ्या आतुरतेने गणेशोत्सवाची वाट पाहिली जाते आणि तयारी देखील केली जाते. विदेशातही पर्यावरण पूरक उत्सव साजरा करत असल्याची माहिती रचना फासाटे यांनी दिली.
आफ्रिकेच्या मातीतून साकारली जाते बाप्पाची मूर्ती -
नॉर्थ आफ्रिकेत मोरोको या भागात मुस्लिम नागरिकांची संख्या अधिक आहे. त्याठिकाणी बाप्पाची मूर्ती मिळत नसल्याने रचना फासाटे त्यांचा मुलगा निसर्ग याच्या मदतीने दरवर्षी घरीच मूर्ती घडवतात. त्याठिकाणी असलेल्या मातीचा वापर करून सुंदर मूर्ती त्या साकारतात. विदेशी मातीत देखील बाप्पाचे रूप मनमोहक असून, बाप्पाची स्थापना झाल्यावर वेगळा आनंद असल्याचे रचना फासाटे यांनी सांगितले.
गणेश उत्सवात दिला, गावाकडे परत येण्याचा संदेश -
मोरोको सारख्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करत असताना घरात गणेशाची स्थापना करून वेगवेगळे देखावे केले जातात. मागील वर्षी अंबाला बसेकॅम्प उभारण्यात आला होता. तर यावर्षी गावाकडे चला असा संदेश देत गावातील आठवणी जागवण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधीजी म्हणाले होते खरा भारत बघायचा असेल तर गावाकडे चला. आज आपण कितीही प्रगत शहरात किंवा परदेशातील अतिसुंदर देशात राहत असू, पण खरा भारत हा अनुभवांनी आपल्या गावात आहे. ज्या गावात आपण लहानचे मोठे झालो. आयुष्याची वीस वर्ष ज्या गावात काढली. त्या गावाची आठवण आल्या शिवाय राहत नाही. यावर्षी त्याच अनुषंगाने आम्ही या वर्षीचा गणराया विराजमान केला तो याच संकल्पनेने, अशी माहिती रचना फासाटे यांनी दिली.
परिसरात असतो उत्साह -
फासाटे यांच्या घरी साजरा होणारा गणेशोत्सव पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची रेलचेल असते. या दहा दिवसात गणपती सजावट बघण्यासाठी दूरवरचे मित्र अगदी दोनशे - तीनशे किलोमीटरचा प्रवास करून आवर्जून येतात. सायंकाळी होणाऱ्या आरतीमध्ये आसपासचे विदेशी नागरिक आवर्जून सहभागी होतात. या निमित्ताने भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्याची संधी मिळते. संपूर्ण सजावटीमध्ये भारतीय मित्रांची मोलाची साथ मिळते. त्यात पती प्रकाश फासाटे, मुलगा निसर्ग यांच्यासह नंदकुमार सुतार, प्रमोद शिंदे, स्नेहल शिंदे, विठ्ठल पाटील यांची मदत होते असे मत रचना फासाटे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा -'प्रत्येक दगडात दिसतात 'बाप्पा''; महाराष्ट्र भूषण डॉ. राणी बंग यांच्याकडे बाप्पाच्या 10 हजार मूर्त्यांचा अनोखा संग्रह