महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जनश्री विमा योजना घोटाळा : मृतांच्या नावे विम्याचे पैसे लाटणाऱ्या चौघांना अटक - औरंगाबाद

केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या जनश्री विमा योजनेच्या ९९ लाख ३० हजार रुपयांच्या घोटाळाप्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

वेदांतनगर पोलीस ठाणे

By

Published : May 30, 2019, 12:28 PM IST

औरंगाबाद- केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या जनश्री विमा योजनेचा गैरफायदा घेत सामाजिक संस्थांनी जीवन विमा पॉलिसीला ९९ लाख ३० हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन संस्था चालक, एक विमा कंपनीचा कर्मचारी आणि एक बँकेचा शिपाई, अशा चौघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे सामाजिक संस्थांनी बनावट कागदपत्राच्या आधारे मृतांच्या नावे रक्कम उचलून त्यांना पुन्हा जीवंत दाखवले होते.


याप्रकरणी १ मे रोजी ८ सामाजिक संस्थांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संस्था चालक अली खान दौड खान, शंकर गायकवाड, विमा महामंडळाचा सहायक लिपीक विनोद सखाराम बत्तीसे (वय ५६ वर्षे, रा. व्दारकापुरी, एकनाथनगर) आणि स्टेट बँक ऑफ इंडीयाचा शिपाई मुरलीधर विठ्ठल खाजेकर (वय ५२ वर्षे, रा. रमानगर, क्रांतीनगर) अशी वेदांतनगर पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.


भारतीय आयुर्विमा महामंडळाचे वरिष्ठ शाखाधिकारी भीमराव सपंतराव सरवदे (वय ६० वर्षे, रा. ईम्पिरीयल हाईट्स, सैनिक कल्याण केंद्राजवळ, प्लॉट क्र. ५१, नंदनवन कॉलनी) हे अदालत रोडवरील कार्यालयात सुमारे दोन वर्षांपासून कार्यरत आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या वतीने २००० मध्ये जनश्री विमा योजना राबविण्यात आली होती.


या योजनेंतर्गत असंघटित लोकांच्या समुहासाठी जीवन विमा पॉलिसी देण्यात आली होती. नियमाप्रमाणे पॉलीसीअंतर्गत समुहातील प्रत्येक सदस्याचा ३० हजारांचा विमा उतरवण्यात आला होता. या योजनेअंतर्गत असंघटित लोकांची नोंदणी सामाजिक संस्थेमार्फत करण्यात आली होती. नोंदणी झालेल्या सदस्यांच्या विमा हप्त्याची अर्धी रक्कम केंद्र शासन व उर्वरीत अर्धी रक्कम संस्थेने भरायची असा नियम होता.


प्रत्येक नोंदणीकृत समुहासाठी एक मास्टर पॉलीसी काढली गेली. तसेच नुतनीकरण करताना समुहातील गतवर्षी मृत सदस्यांना वगळले जायचे. या योजनेप्रमाणे भारतीय आयुर्विमा महामंडळाची समुहविमा योजनेअंतर्गतही समुहविमा दिला जात होता. या समुहविमा योजनेअंतर्गत कमीतकमी २५ जणांना समुहासाठी विमा पॉलिसी दिली जात होती. समुहविमा योजनेचा हप्ता संस्थेमार्फत भरला जात होता. नियमाप्रमाणे महामंडळाच्या वतीने डिसेंबर २०१८ मध्ये वरिष्ठ कार्यालयामार्फत योजनेचे निरीक्षण करण्यात आले. अहवालानुसार विभागीय कार्यालयाने प्रकरणाची सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता.


तपासणीसाठी त्री सदस्यीय समितीने प्रकरणांचा अहवाल ६ मार्च २०१९ ला वरिष्ठ कार्यालयाला दिला. त्यावर ५ ते १८ एप्रिलदरम्यान प्रकरणांची अधिक चौकशी करण्यात आली. त्याचा अहवाल संबंधीत कागदपत्रांसह सादर करण्यात आला. या तपास अहवालात विभागातर्फे आलेल्या मृत्यू दाव्यांच्या कागदपत्रांमध्ये काही संस्थांनी बनावट व खोटे मृत्यू प्रमाणपत्र सादर केले होते. फसवणुकीचा हा प्रकार उघड झाल्यावर ८ संस्थांविरुध्द वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


याप्रकरणी साई बाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जहांगीर कॉलनीचे संस्थाचालक अली खान दौड खान व स्वराज्य मराठवाडा कामगार संघटना, विष्णु नगर, जवाहर कॉलनी रोड या समुहाचे प्रमुश शंकर गायकवाड या दोघांसह विमा महामंडळाचा सहायक लिपीक विनोद बत्तीसे आणि एसबीआयचा शिपाई मुरलीधर खाजेकर यांना अटक करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details