औरंगाबाद- रमजान पर्वाचा पहिला शुक्रवार अर्थात जुम्मा मुस्लीम बांधवांनी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला. यानिमित्त दुपारी शहर व परिसरातील सर्व मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी मुस्लीम बांधवांची जामा मशिदींमध्ये गर्दी उसळली होती.
रमजान इस्लामी कालगणनेतील नववा उर्दू महिना आहे. या महिन्याला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. मुस्लीम बांधव संपूर्ण महिनाभर अल्लाहची उपासना करण्यावर भर देतात. इस्लामच्या पाच मूळ स्तंभांपैकी एक असलेल्या रोजा अर्थात उपवास याच महिन्यात केले जातो. रोजा म्हणजे केवळ उपाशीपोटी राहणे नसून, मनापासून संपूर्ण शरीरापर्यंत सर्व अवयवांचा उपवास करणे, असे मानले जाते. त्यामुळे वाईट बोलू नये, वाईट ऐकू नये, वाईट बघू नये, कोणाला त्रास देऊ नये, वाईट ठिकाणी जाऊ नये, अशा विविध अंगांचा रोजामध्ये समावेश असतो, असे धर्मगुरुंनी जुम्माच्या नमाज पठणापूर्वी दिलेल्या प्रवचनातून सांगितले.