औरंगाबाद - मित्र-मैत्रिणींच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये देव-देवतांबद्दल अश्लील चॅटिंग केल्याप्रकरणी चार तरुणांवर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहा महिन्यांपासून या तरुणांचा हा प्रकार सुरू होता. यादरम्यान, त्यांना अनेकदा समजावून सांगण्यात आले. मात्र, ते ऐकत नव्हते. त्यामुळे एका तरुणीने अखेर क्रांती चौक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
व्हॉट्सअॅप ग्रुपवर देवी-देवतांचा अवमान, चौघा जणांवर गुन्हा दाखल - Whats app group news
व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये देव-देवतांबद्दल अश्लील चॅटिंग केल्याप्रकरणी चार तरुणांवर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अर्थ मुनिष देवपुरी, रितेश जाधव, अंकित अविनाश छकडी आणि आदित्य राजू पवार असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय तरुणीच्या फिर्यादीनुसार कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदार युवती मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेते. मात्र सध्या कॉलेज बंद असल्याने ती औरंगाबादेतच राहते. तिच्या कॉलेजच्या मित्रांचा 'चिवडा मेड अवर डे' नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. याग्रुपमध्ये आरोपींची देवांचा अवमान करणाऱ्या पोस्ट केल्याची तक्रार युवतीने केली आहे.
१२ नोव्हेंबर २०२० रोजी मित्र-मैत्रिणींचे गेट टुगेदर आयोजित केले तेव्हा तरुणीला तिचे मित्र पूर्वीसारखे राहिले नसल्याचे जाणवले. तेव्हा अर्थ देवपुरीसह अन्य आरोपी मित्रांनी देव-देवतांबद्दल अश्लील व खिल्ली उडविणारी माहिती चॅट केली. २८ डिसेंबर २०२० रोजी वेरूळ लेणी येथे महादेवाच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर याच आरोपींनी फिर्यादीची खिल्ली उडविली होती. ४ जानेवारीला पुन्हा या आरोपींनी देवांबद्दल अश्लील चॅटिंग केली. त्यानंतर त्यांना समजावून सांगण्यात आले. मात्र, ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. २१ एप्रिलला तर त्यांनी हद्द सोडली. त्यानंतर मात्र तरुणीच्या भावना दुखवल्याने तिने सरळ क्रांती चौक पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून चौघांविरुद्ध क्रांती चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.