औरंगाबाद - कोरोनाशी दोन हात करत असताना औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणा पूर्णतः सज्ज ठेवली आहे. खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून देखील काही बेड्स आरक्षित केले आहेत. त्याच बरोबर शासकीय स्तरावर देखील रुग्णांना उपचार देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी ईटीव्ही भारतला दिली.
खासगी रुग्णालयात कोविडचे उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून अवाजवी पैसे घेत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर एक बैठक घेऊन प्रशासनाच्या वतीने महसूल विभागाचा एक आणि उपजिल्हाधिकारी स्तराचा एक अधिकारी नेमण्यात आला आहे. हे अधिकारी रुग्णांना किती शुल्क करण्यात येत आहेत, याबाबत लक्ष ठेवून असून कोणालाही जास्तीचे शुल्क लागणार नाही, याबाबत काळजी घेतली जात असल्याची माहिती आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.
औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांची प्रतिक्रिया.... हेही वाचा -राज्यात 2 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण; पाहा प्रमुख शहरांमधील आरोग्य यंत्रणांची तयारी
कोविडचे उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना दाखल करून घेण्यास महापालिकेने व्यवस्था केली आहे. ज्यात शासकीय रुग्णालयात जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली. शासकीय स्तरावर जिल्हा रुग्णालयात - 170, घाटी रुग्णालयात - 450, सिपेट कोविड रुग्णालयात - 250, ईएसआय रुग्णालय - इतके बेड्सची व्यवस्था आहे. तर, खासगी रुग्णालयांमध्ये बजाज रुग्णालय - 74, धुत रुग्णालय - 70, एमजीएम रुग्णालय - 250, हेडगेवार - 53, वायऐसके - 150 तर विविध ठिकाणच्या कोविड केअर सेंटर मध्ये 920 इतक्या बेड्सची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी संशयित रुग्णांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात येत होते. त्यामुळे जागा लवकर उपलब्ध होण्यास अडचणी आल्या होत्या. मात्र, आता गरज असेल तरच आयसीयुमध्ये दाखल करा, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णांना दाखल करून घेण्यास कोणतीही अडचण नसल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले. तर जास्त रुग्ण आढळून आले तर पाचशे रुग्णांना उपचार घेता येईल, अशा पाचशे खाटांची अतिरिक्त व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच नव्याने काही खासगी रुग्णालयात उपचारांसाठी सज्ज करण्याची तयारी करत असल्याचीही माहिती आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.