औरंगाबाद :यावर्षीचा दसरा सर्वांसाठीच वेगळा मानला जातो आहे. विशेषतः राजकीय मंडळींसाठी तर आपलं शक्तिप्रदर्शन करण्यासाठीचा हा सण असल्याचा दिसून येत आहे. दरवर्षीप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) हे देखील दसरा मेळावा घेणार आहेत. त्यामुळे यावर्षी नेमकी कुठे हजेरी लावायची असा संभ्रम अनेक शिवसैनिकांमध्ये निर्माण झाला आहे.
एकनाथ शिंदे गटाकडून तयारी :उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदा स्वतंत्रपणे शिवसेना गटाला घेऊन दसरा मेळावा घेणार आहेत. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून कार्यकर्त्यांना घेऊन जाण्यासाठी शिंदे समर्थक आमदारांनी कंबर कसली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातून 25 ते 30 हजार लोकांना घेऊन जायचं असं नियोजन करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी अनेक लोक उत्सुक आहेत. त्यामुळे कुठल्याही पद्धतीत मेळाव्याला जायचं असा मानस अनेकांनी केला आहे. शहरातून आणि जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक मेळाव्याला जातील असा दावा राज्याचे कृषिमंत्री आणि शिंदे गटाचे समर्थक आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.