औरंगाबाद - कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता औरंगाबाद शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार रात्री अकरा ते सकाळी सहापर्यंत शहरात संचारबंदी असणार आहे. प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता आणि मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
दुसऱ्या टप्प्यात भाजी मंडईवर लागू शकतात निर्बंध
औरंगाबाद जिल्ह्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनारुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यानुसार आता जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध लावायला सुरुवात केली आहे 23 फेब्रुवारी ते 14 मार्च या काळात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. कोरोनारुग्णांच्या संख्येत घट न झाल्यास दुसऱ्या टप्प्यात आठवडी बाजार आणि भाजीमंडई बाबत निर्णय घेण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनारुग्णांमध्ये वाढ होत चालली असून आजपर्यंत एकूण रुग्ण संख्या 48 हजार 770 इतकी झाली आहे. त्यात 46 हजार 574 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आजपर्यंत 1255 जणांचा करणामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जिथे रोज 50 ते 60 नवीन बाधित आढळून येत होते, तिथे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हा आकडा रोज शंभरी पार करत आहे. रविवारी तर 201 नवीन बाधित रुग्ण आढळून आले होते. रोजची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध लावायला सुरुवात केली आहे. त्यानुसार रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असून रूग्ण संख्येत वाढ होत राहिल्यास आणखी कठोर निर्णय घेण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.