औरंगाबाद- शहरातील कोविड सेंटरमध्ये डॉक्टरने महिला रुग्णाकडून शरीर सुखाची मागणी करत बलात्काराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटले. त्यानंतर त्या डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारावई करण्यात येणार असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल -
औरंगाबाद महापालिका हद्दीतील दवाखान्यात एका महिलेवर डॉक्टरकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना गंभीर आहे, याचे कोणीही समर्थन करणार नाही. परंतु महिलेवर बलात्कार झालेला नाही. प्राथमिक चौकशी करून त्या डॉक्टरला बडतर्फ केले आहे. तरीही वरिष्ठांकडून याची सखोल चौकशी केली जाईल. या महिलेचे नाव बाहेर न येता लवकरच संपूर्ण घटनेचा आढावा घेऊन सबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच सर्व कोविड सेंटरसाठी ३१ मार्चच्या आत एसओपी जाहीर केली जाईल, असे आश्वासनही पवार यांनी यावेळी दिले.