औरंगाबाद : दिवाळी म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते शेव, चिवडा, चकली, गोड शंकरपाळे, अनारसे, सुका मेव्याच्या करंज्या. प्रत्येक दिवाळीला महिनाभर आधीपासूनच यासाठी तयारी सुरू होते. यंदा मात्र तेलाच्या किंमती वाढल्याने हे दिवाळीचं फराळ महागल्याची प्रतिक्रिया प्रत्येक होम मिनिस्टर कडून ऐकायला मिळत आहे.
दिवाळी विशेष : तेलाचे भाव वाढल्याने दिवाळी फराळ महागले दोन वर्षांपूर्वी कोरोना संसर्गजन्य आजाराने शिरकाव केला. यामुळे संपूर्ण जग थांबल्यासारखं झालं होतं. दरम्यानच्या काळात अनेकांच्या नोकर्यांवर गदा आली. तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. यामुळे सर्वसामान्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं. परिणामी सर्वसामान्य नागरिक हा आर्थिक संकटात सापडला गेला. गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गजन्य आजार हा नियंत्रणात आल्याने सरकारने नियम शिथिल केल्याने व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. यामुळे यंदाची दिवाळी चांगली जाईल असं वाटत असतानाच तेलाच्या धारांनी यावर विरजण घातले. दोन वर्षांपूर्वी 80 ते 100 रुपये प्रतिलिटरा दरम्यान असलेलं तेल आता दीडशेच्या पार गेले आहे. यामुळे यंदाचा फराळ तेलामुळे महाग झाला आहे. केंद्र सरकाने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी कराव्या अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिक करीत आहे.
कस्टम ड्युटी व कृषी उपकरात कपातकेंद्र सरकारने ३१ मार्च २०२२ पर्यंत कस्टम ड्युटी व कृषी उपकरात कपात जाहीर केली. कच्च्या पाम तेलावर १७.५ टक्के आणि सूर्यफुलाच्या कच्च्या तेलावर ५ टक्के कृषी उपकर लावण्यात येणार आहे. कस्टम ड्युटी कमी होऊन पाम तेल ८.२५ टक्के, सोयाबीन तेल ५.५, तर सूर्यफूल तेल ५.५ टक्केपर्यंत खाली आणले आहे. याचा परिणाम बाजारपेठेवर हळूहळू दिसू लागला आहे. सोयाबीन तेल १० रुपयांनी घटून १३५ रुपये, ५ रुपये कमी होऊन पामतेल १३० रुपये, तर सूर्यफूल तेल १५० रुपये प्रतिलीटर विकत आहे.
जुना साठा मोठ्या प्रमाणातरिफाइंड करणाऱ्या तेल मिलकडे खाद्येतलाचा मोठा साठा आहे असल्याचा आरोप होत आहे. दिवाळी लक्षात घेऊन चढ्या किमतीत साठा करून ठेवल्याचा आरोप केला जात आहे. काही खाद्यतेल रिफाइंड करणाऱ्या मिलने अजूनही पॅकिंगच्या तेलाचे भाव कमी केले नाहीत. मात्र सुट्या तेलात भाव कमी होऊ लागले आहेत.