औरंगाबाद - मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केला असून १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळात मतदान पार पडणार आहे. याबाबत अधिक माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनाचे नियम पाळून पार पडणार पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडत असताना कोविडच्या नियमावलीचे पालन केले जाणार आहे. बिहार निवडणुकीत असलेले नियम या निवडणुकीत लावण्यात येतील. प्रत्येक जिल्ह्यात नोडल हेल्थ ऑफिसरची नेमणूक केली जाईल. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी शेवटच्या एका तासात मतदान करण्याची मुभा असेल. मात्र, अद्याप त्याबाबत स्पष्टता नाही. माहिती मिळाल्यावर ती प्रसिद्ध करू, असे विभागीय आयुक्त म्हणाले.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना ५ नोव्हेंबर रोजी जारी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची १२ नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छानणी १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. उमेदवारांना १७ नोव्हेंबरपर्यंत त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल मागे घेता येतील.
या मतदारसंघात १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या वेळात मतदान घेतले जाणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया ७ डिसेंबर रोजी संपणार असल्याचेही केंद्रेकर यांनी सांगितले.
साडेतीन लाख मतदार
मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये जवळपास साडेतीन लाख मतदार मतदानाचा हक्क बाजावतील. अद्याप मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याने, मतदार वाढतील. अंतिम यादी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जाहीर केली जाईल, अशी माहिती सुनील केंद्रेकर यांनी दिली.
कोरोनाची काळजी घेऊन मतदान प्रक्रिया
कोरोना विषाणू संसर्गाच्या काळातच मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक घेतली जात असल्यामुळे या निवडणुकीसाठी शारीरिक अंतर पाळणे, मास्क लावणे अशा नियमांचे मतदारांना पालन करावे लागणार आहे. त्यात मास्क घालणे, मतदानासाठी मोठ्या खोल्या वापरणे, थर्मल स्कॅनिंग करणे, सॅनिटायझर वापरणे, एका केंद्रावर एक हजार मतदार मतदान करू शकतील अशी व्यवस्था, सभा घेताना सोशल डिस्टन्सचा वापर आणि इतर नियमांचे पालन केले जाईल याकडे उमेदवारांनी लक्ष द्यायचं आहे.
बारा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचं पारडं जड
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मागील दोन टर्म म्हणजे बारा वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसचं वर्चस्व राहीलंय. सतीश चव्हाण आमदार म्हणून दोन वेळा निवडणून आले होते. यंदा राज्यात महाविकास आघाडी निर्माण झाल्याने ही निवडणूक आघाडीत लढली जाणार की सर्वपक्ष स्वतंत्र लढणार याबाबत निर्णय झाल्यावर उर्वरित चित्र स्पष्ट होणार आहे.