महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

काँग्रेसच्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्री कार्यालयाकडून संभाजीनगर नावाचा वापर सुरूच - मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेले ट्विट -

औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्यावरुन काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वाद उघड होत चाललाय. नामांतरणाचा विषय आघाडी सरकारच्या अजेंड्यावर नाही असे काँग्रेसचे मत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या शासकिय ट्विटर हँडलवर मात्र औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच होत आहे. याला काँग्रेसने आक्षेप घेतलाय.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे

By

Published : Jan 8, 2021, 2:27 PM IST

मुंबई - औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यावरून राजकीय वाद रंगला आहे. राज्यात आघाडी सरकारमधील काँग्रेसने संभाजीनगर नाव करण्यास विरोध दर्शविला आहे. त्यानंतरही मुख्यमंत्री कार्यालयाकडून काँग्रेसच्या विरोधाला न जुमानता संभाजीनगर या नावाचाच वापर केला जात असल्याने येत्या काळात हा वाद आणखी पेटणार असे दिसून येत आहे.

राजकीय वाद -

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी राज्यातील सत्ताधारी शिवसेना आक्रमक झाली आहे. मात्र नाव बदलून विकास होत नाही असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नामांतराला विरोध केला आहे. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय महाविकास आघाडीचा नाही, असे सांगितले आहे. संभाजीनगर नाव करण्यास समाजवादी पक्षानेही विरोध केला आहे. ऐतिहासिक नावे न बदलता नवीन जिल्हे बनवून त्यांना नावे द्यावीत, रायगडला संभाजी नगरचे नाव द्यावे अशी मागणी समाजवादीचे आमदार अबू आझमी यांनी केली. तर आरपीआयनेही संभाजीनगर नाव करण्यास विरोध केला असून नाव बदलल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. आदित्य ठाकरे यांनी या वादावर तोडगा निघेल असे म्हटले आहे.

संभाजीनगर नावाचाच वापर -

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय ट्विटर हँडलवर औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे वापरले जात आहे. याबाबत काँग्रेसने उघड नाराजी व्यक्त केली आहे. शासकीय ट्विटर हँडलवर शासकीय नावच वापरावे असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. त्यानंतरही काँग्रेसच्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्र्यांच्या शासकीय ट्विटर हँडलवर संभाजीनगर हेच नाव वापरले जात आहे. हा वाद सुरू झाल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने दुसऱ्यांदा ट्विट करत संभाजीनगर नावाचा उल्लेख केला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेले ट्विट -

"काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत राज्यातील नियमित न झालेल्या गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. मी काही दिवसांपूर्वी संभाजीनगरवासीयांना याविषयी आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता केली आहे...(१/२)

मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेले ट्विट -

त्यामुळे संभाजीनगर सारख्या मराठवाड्याच्या राजधानी शहरातील सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार होणार असून उत्तम रितीने नागरीकरण होऊ शकेल. यापुढे देखील असे जनहिताचे निर्णय घेण्यात येतील त्याकरिता आपले सहकार्य आणि प्रेम असेच राहू द्या." -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

हेही वाचा - ठरलं..! 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशकात होणार

ABOUT THE AUTHOR

...view details