औरंगाबाद- महाविद्यालयीन मित्राचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे 24 वर्षीय तरुणी डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यामुळे रात्री दोन वाजेपर्यंत ती दवाखान्यासमोर बसून राहायची. यामुळे मुलीची आई, मुलगी घरात नसल्याने सतत चिंतेत राहायची. मुलीच्या आईने दामिनी पथकाकडे तक्रार दिल्यानंतर दामिनी पथकाने त्या मुलीला विश्वासात घेत तिचे समुपदेशन केले. यामुळे डिप्रेशन मध्ये गेलेल्या मुलीला काहीसा आधार मिळाला, असल्याची माहिती दामिनी पथकाच्या निर्मला निंभोरे यांनी दिली.
मुलीच्या आईची दामिनी पथकाकडे तक्रार
निर्मला निंभोरे म्हणाल्या की, पोलीस आयुक्त कार्यालयास आलेल्या तक्रारीनुसार शहरातील नंदनवन कॉलनीत राहणाऱ्या महिलेने दामिनी पथकाची भेट घेतली होती. त्यावेळी 'माझी आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, माझ्या पतीचे पाच महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. माझी मुलगी राखी (नाव बदललेले आहे) ही जवळपास तीन महिन्यांपासून रात्रीचे दोन ते तीन वाजेपर्यंत घरी येत नाही. त्यामुळे आम्ही खूप चिंतेत आहोत. मुलगी नीट उत्तरही देत नाही, कुठे जाते हे सांगत नाही', अशी तक्रार मुलीच्या आईने दामिनी पथकाकडे दिली.