औरंगाबाद - मालमत्ते विरुद्ध होणाऱ्या गुन्हेगारी रोखण्यासाठी व नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारी निरीक्षण योजना शहरात सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या गुन्हेगारांवर मालमत्ते विरुद्ध गंभीर गुन्हे दखल आहे, अशा गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जात आहे. या गुन्हेगारी निरीक्षण योजनेमुळे सहा महिन्यानंतर शहरातील मालमत्ते विरुद्ध होणारे गुन्हे कमी होतील, अशी अपेक्षा पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली आहे.
पोलीस आयुक्तांशी संवाद साधताना प्रतिनिधी औरंगाबाद शहरामध्ये पोलीस आयुक्तालय हद्दीतील १७ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारी निरीक्षण योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्या गुन्हेगारांविरुद्ध मालमत्तेचे गुन्हे दाखल आहेत, अशा गुन्हेगारांवर ती नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना नेमण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांकडून त्या गुन्हेगाराच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येते. त्यासोबतच त्याला वेळोवेळी पोलीस ठाण्यामध्ये हजर केले जाते.
चोरी, घरफोडी, दुचाकी चोरी, दरोडा यासारखे गुन्हे : पोलीस आयुक्तालय हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली. या यादीनुसार मंदी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्या गुन्हेगाराची माहिती घेणे, त्याला दर तीन महिन्याच्या अंतराने पोलीस ठाण्यामध्ये बोलावणे, त्यासोबतच त्याचे मित्र कोण आहेत, तू काय काम करतो याची माहिती घेतली जाते. या योजनेमुळे संबंधित गुन्हेगाराची पोलिसांकडून नियमित माहिती घेतली जाणार असल्यामुळे त्यांच्या वचक निर्माण होईलव गुन्हे कमी होतील. हा उद्देश या योजनेमागे असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी सांगितले आहे.
1 हजार 500 हून अधिक गुन्हेगारांवर नजर :औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील 17 पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या 4 वर्षांमध्ये मालमत्ते विरुद्धचे गंभीर गुन्हे केलेल्या १५०० पेक्षा अधिक सराईत गुन्हेगारांवर या गुन्हेगारी निगराणी योजनेअंतर्गत काम केले जात आहे. या सराईत गुन्हेगारांची वारंवार पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून घेतली जाणारी माहिती यामुळे येत्या सहा ते वर्षभरामध्ये शहरातील मालमत्ते विरुद्धचे गुन्हे कमी होतील, अशी अपेक्षा पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -Pune Crime : 25 लाखांची रक्कम लुटणाऱ्या 5 जणांना मध्यप्रदेशमधून अटक; पुणे पोलिसांची कारवाई