महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनाचे दुष्परिणाम - डोळे आणि दातांच्या समस्या उद्भवू शकतात - Corona Update

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना फंगल इन्फेक्शन म्हणजे बुरशीजन्य आजाराचा विळखा बसत असल्याचा समोर आले आहे. या नव्या इन्फेक्शनमुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे, 13 जणांचे डोळे काढावे लागले तर जवळपास 96 जणांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे.

कोरोनाचे दुष्परिणाम
कोरोनाचे दुष्परिणाम

By

Published : May 5, 2021, 10:38 AM IST

औरंगाबाद- कोरोनाचा आजार झाल्यानंतर उपचार घेऊन घरी परतलेल्या अनेक रुग्णांना फंगल इन्फेक्शन म्हणजे बुरशीजन्य आजाराचा विळखा बसत असल्याचे समोर आले आहे. या नव्या इन्फेक्शनमुळे डोळ्यांच्या समस्या, जबड्यांचे विकार यामध्ये भर पडली आहे. महानगरपालिकेच्या वतीने आयोजित शहरातील डॉक्टरांच्या बैठकीमध्ये हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या नव्या इन्फेक्शनमुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे, 13 जणांचे डोळे काढावे लागले तर जवळपास 96 जणांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोरोनाचे दुष्परिणाम

कोविड नंतर बुरशीजन्य आजाराची भीती

कोविड नंतर शहरात बुरशीजन्य आजार असलेले रुग्ण आढळून येत आहेत, कोरोनामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते. अनियंत्रित मधुमेह, त्याचे निदान लवकर झाले नाही, तर हा आजार जीवघेणा ठरू शकतो. मात्र योग्य वेळी उपचार घेतले तर आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. महानगर पालिकेत झालेल्या बैठकीनुसार जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील 8 जणांचा मृत्यू बुरशीजन्य आजारामुळे झाला आहे. तसच 13 जणांचे डोळे काढावे लागले आहेत. तर 96 जणांच्या जबड्यावर आणि सायनस मुळे 105 रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. बुरशीजन्य आजार घातक असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली आहे.

असे होते इन्फेक्शन

कोरोनाचे उपचार घेतल्यानंतर अचानक बुरशी यायला सुरू होते. सुरुवातीला नाकापर्यंत ही बुरशी तयार होते. पुढे जाऊन ही हळू हळू शरीरात इतर अवयवांवर येऊ लागते. त्यानंतर ती डोळ्यांपर्यंत पसरते याकडे जर दुर्लक्ष केलं तर ही बुरशी मेंदूपर्यंत जाऊन रुग्ण बेशुद्ध पडू शकतो आणि त्यातूनच त्याला अर्धांगवायू होणे किंवा मृत्यू होण्याचा धोका वाढतो.

अशी आहेत लक्षणे

फंगल इन्फेक्शन ची सुरुवात नाकापासून होत असून त्यानंतर हळू-हळू डोळे, मेंदूपर्यंत पसरत जाते. याची लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. ज्यामध्ये नाकातला श्वास कोंडणे, काळ्या बुरशीचा चट्टा नाक आणि टाळू येथे आढळणे. दात दुखणे, चेहऱ्याच्या हाडांना म्हणजेच जबड्याला असह्य वेदना होणे. डोळे दुखने, डोळे सुजने किंवा दृष्टी कमजोर होणे ही लक्षणे आढळत आहेत. त्यामुळे बुरशी डोळ्यांपर्यंत आल्यानंतर डोळे काढणे हा एकमेव पर्याय शिल्लक राहतो. हा आजार उद्भवल्यास रुग्णाने तातडीने नाकाची दुर्बिणीद्वारे तपासणी करून घ्यावी, नाकातील स्त्रावाची बुरशी जंतूसाठी तपासणी करावी, तसेच डोळे व सायनस मधील बुरशी जंतुसंसर्ग शोधण्यासाठी सीटी स्कॅन आणि एमआरआय करून घ्यावा, असे मत मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी व्यक्त केलं.

लक्षणे आढळल्यास तज्ञ डॉक्टरांचा घ्या सल्ला

कोविड नंतर लक्षणे आढळल्यास त्वरित मनपाच्या 8956306007 या कोविड हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी केले आहे. मनपाने आयोजित केलेल्या बैठकीत फंगल इन्फेक्शन बाबत उपचाराची दिशा ठरवण्यात आली आहे. इन्फेक्शन आढळून आल्यास तातडीने बुरशी रोधक औषधी घ्यावी किंवा सर्जिकल उपचार करावेत. सौम्य बीटाडीन चे नाकात ड्रॉप टाकावेत अशा पद्धतीचे बैठकीत उपचार ठरवण्यात आले आहेत. मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील तज्ञ डॉक्टरांची बैठक पार पडली या डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची व आढळणाऱ्या आजारांचा बाबत माहिती दिली. बैठकीत मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर मेघा जोगदंड, नेत्रतज्ञ डॉ. अरुण अडचित्रे, डॉ. नळगिरकर, डॉ. अमित विश्वे, डॉ. झंवर, डॉ. मिश्रिकोटकर घाटीतील कान-नाक-घसा तज्ञ डॉ. वसंत पवार, डॉ. वरे, डॉ. प्रवीण सोनवतीकर, डॉ. भारत देशमुख, डॉ. अमोल सुलाखे, डॉ. सावजी, डॉ. रितेश भागवत यांची उपस्थिती होती.

हेही वाचा -कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई पोलिसांना, 2020 मध्ये 230 मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details