औरंगाबाद- पैठणी म्हणलं की काठावर असलेली मोराची किंवा इतर जरदारी नक्षी असलेल्या साड्या महिलांना आपोआपच आकर्षित केल्याशिवाय राहत नाही. मात्र, याच पैठणीचा व्यवसाय आता प्रचंड अडचणीत सापडला आहे. कोरोनामुळे पैठणीच्या विक्रीत 95 टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे समोर आले आहे, तर पैठणीला घडवणाऱ्या कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
लॉकडाऊननंतर पैठणी कारागीर अडचणीतच... भारतात औरंगाबादच्या पैठण येथे नावारूपाला आलेल्या पैठणीला महावस्त्र म्हणून वेगळी ओळख आहे. लग्नसराई असो की कोणता शुभ प्रसंग, महिलांची पहिली पसंती ही पैठणीलाच असते. मात्र, गेल्या चार महिन्यात सरासरीच्या पाच ते दहा टक्केच व्यवसाय होत असल्याने कारागिरांना सांभाळणे अवघड होत असल्याचे मत औरंगाबादचे पैठणी व्यावसायिक रमेश खत्री यांनी व्यक्त केले.
पैठणी हे नाव देशविदेशात प्रसिद्ध आहे ते त्याच्या कलाकुसरीमुळे. राज्यात जवळपास चार हजार कारागीर पैठणीची निर्मिती करण्याचे काम करतात. एक साडी तयार करण्यासाठी एक महिन्यांपासून ते एक वर्षांपर्यंतचा वेळ लागतो. प्रत्येक धागा हाताने विणून ती साडी तयार करण्यात येते. त्यामुळे पैठणीचे भाव 9 हजारांपासून ते दीड - दोन लाखांपर्यंत आकारले जातात. जितकं नक्षीकाम असलेलं विणकाम अधिक तितके दर देखील अधिक आकारले जातात.
देशात बंगळुरू, हैदराबाद अशा ठिकाणी पैठणीची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचबरोबर राज्यांमध्ये पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे अशा शहरांमध्ये पैठणीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असतो. वर्षाकाठी जवळपास दहा कोटींहून अधिक उलाढाल पैठणीच्या माध्यमातून होत असते. मात्र, गेल्या चार महिन्यांमध्ये सरासरी जी विक्री होत असते त्यामध्ये 90 टक्क्यांहून जास्तची घट झाल्याचे समोर आले आहे.
मार्च-एप्रिल हा महिना लग्न समारंभासाठी असतो. या लग्नसराईमध्ये पैठणीची मागणीही मोठ्या प्रमाणात केली जाते. लग्न ठरलं की त्याच दिवशी पैठणी घ्यायची असा मानस मराठवाड्याच्या भागांमध्ये पाहायला मिळतो. त्यानुसार पैठणीची विक्री या दोन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असते. इतकेच नाही तर औरंगाबादला पर्यटनाची राजधानी मानली जाते, मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी पर्यटक औरंगाबादला भेट देत असतात. त्यावेळेस औरंगाबादचे प्रमुख आकर्षण काय तर पैठणी. मग एक पैठणी ती घेऊन जायला हवी अशी धारणा अनेक पर्यटकांची असते. त्यामधूनही मोठी उलाढाल दरवर्षी होत असते. मात्र, मार्च महिन्यापासून सर्व पर्यटनस्थळ बंद आहेत. पैठणीच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्याचा परिणाम हा आता पैठणीच्या विक्रीतून दिसून येत आहे. अनेक कारागीर हे पैठणी केंद्रातून काम करतात, तर त्याहून अधिक कारागीर हे आपल्या घरूनच पैठणी विणण्याचे काम करत असतात.
जवळपास 90 ते 95 टक्के विणकर हे आपल्या घरूनच साडी विणण्याचं काम करतात. साडी तयार झाली की त्यानुसार त्याला त्याचा मोबदला दिला जातो. अनेक ठिकाणी पहिले ऑर्डर देऊन त्या तयार करून घेतल्या जातात. मात्र, मागच्या चार महिन्यांपासून पैठणी तयार करणाऱ्या विणकारांच्या कामांमध्ये मोठा बदल झाला आहे. काही विणकरांना आपल्या कामाचा मोबदला ही मिळाला नसल्याचा अनुभव सांगितला. लॉकडाऊनमुळे पैठणी केंद्रात जाता आले नाही. त्यामुळे काम नाही, तर त्याचे वेतनही मिळत नाही, अशा तक्रारी आहेत. आता पुढच्या काळात उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न या कारागिरांना पडला आहे. हातात कला आहे. मात्र, त्या कलेचा आताच्या काळात उपयोग होताना दिसून येत नाही.
पैठणी विणण्याशिवाय इतर कुठलेही काम आपल्याला जमत नाही. त्यामुळे आता दुसरे काम काय करणार आणि घर कसे चालणार? असा प्रश्न निर्माण झाल्याचे औरंगाबादच्या कारागिरांनी सांगितले. तर, मोठ्या प्रमाणात विक्री घटल्याने आता पैठणी केंद्र सुरू कसे ठेवावे आणि तिथे काम करत असलेल्या लोकांना वेतन कसे द्यायचे असा मोठा प्रश्न उपस्थित झाल्याचे औरंगाबादचे पैठणीचे विक्रेते रमेश खत्री यांनी सांगितलं.